नगरमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:38+5:302021-08-25T04:26:38+5:30
अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मंगळवारी (दि. २४) नगरमध्ये गुन्हा ...
अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मंगळवारी (दि. २४) नगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे नगरसवेक बाळासाहेब मारुती बोराटे (वय ५१) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी राणे यांच्या विरोधात कलम ५००, कलम ५०५(२) व कलम १५३ ब प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत बोरटे यांनी म्हटले आहे की, मी २३ ऑगस्ट रोजी सकाळी माझ्या घरात टीव्ही पाहत असताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाबाबत बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून राणे यांनी समाजामाध्ये तेढ, द्वेषाची भावना निर्माण केली आहे. सदरची बातमी शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे, कार्यकर्ते दिलीप सातपुते, भगवानराव फुलसौंदर, संजय शेंडगे, स्मिता आष्टेकर, आशाताई निंबाळकर, विक्रम राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे आदींनी पाहिली असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
------------------
शिवसैनिक आक्रमक, प्रतिमेला मारले जोडे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याचे नगर शहरातही पडसाद उमटले. मंगळवारी सकाळी शिवसैनिकांनी शहरातील गांधी मैदानातील शहर भाजप कार्यालयासमोर आक्रमक घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन केले. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, संभाजी कदम, स्मिता अष्टेकर, अनिल शिंदे, गणेश कवडे, संजय शेंडगे, रोहन ढवण आदी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय संगमनेर शहर आणि नगर शहरातील माळीवाडा भागातील शौचालयाला राणे यांचे नाव देऊन शिवसैनिकांनी राणे यांचा निषेध केला. शिर्डी, कोपरगाव आदी ठिकाणीही राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले.
-------
फोटो -२४ आंदोलन