Coronavirus: चमकोगिरी चांगलीच भोवली; भाजपाच्या माजी खासदाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 11:38 AM2020-04-07T11:38:12+5:302020-04-07T11:41:50+5:30
नगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : जंतुनाशक फवारणी करण्यासाठी नेते स्वतःच फवारणी करीत आहेत. परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही स्वःताहुन फवारणी करता येत नाही. तरीही माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक सुवेद्र गांधी यांना चमकोगिरी चांगलीच भोवली आहे. त्यांच्या विरुद्ध नगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता शहरातील कापड बाजार, जुना बाजार परिसरात फवारणी केल्याने माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र व माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या विरोधात सोमवारी कोतवाली पोलिस ठाण्यात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिकेतील कर्मचारी सीताराम रानबा शितोळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सुवेंद्र गांधी यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शहरातील कापड बाजार, जुना बाजार व फारशाखुंट परिसरात फवारणी केली होती. अशी फवारणी करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असून तसे प्रशासनाने आदेश दिले आहेत. गांधी यांनी मात्र कुठल्या प्रकारची परवानगी न घेतल्याने त्यांच्या विरोधात वरिष्ठांशी चर्चा करून फिर्याद दाखल करत असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.