११ हजार मतदारांची भर
By Admin | Published: September 18, 2014 11:15 PM2014-09-18T23:15:33+5:302024-10-04T14:47:23+5:30
अहमदनगर: विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी १० हजार ८५० नवीन मतदारांनी नोंदणी केली
अहमदनगर: विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी १० हजार ८५० नवीन मतदारांनी नोंदणी केली असून, सर्वाधिक मतदार नोंदणी नगर शहरात झाली़ जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३२ लाख १५ हजार २०३ झाली असून, पुरवणी मतदार यादी लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे़
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शनिवारपासून सुरुवात होत आहे़ त्यामुळे मतदार नोंदणीसाठी बुधवारी अखेरचा दिवस होता़ शहरासह जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली़ अखेरच्या दिवशी शहरासह जिल्ह्यात १० हजार ८५० मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती निवडणूक शाखेन दिली आहे़ जिल्हा निवडणूक शाखेच्या आहवालानुसार नगर शहरात सर्वाधिक १ हजार ६५० मतदार नोंदणी झाली आहे़ तर राहाता तालुक्यात सर्वात कमी २७१ मतदार नोंदणी झाली आहे़विशेष मोहिमेत झालेल्या मतदार नोंदणीमुळे मतदारांची संख्या ३२ लाख १५ हजार २०३ झाली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ कारण काही मतदान केंद्रावरील नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले नाहीत़ हे अर्ज येत्या एक- दोन दिवसांत प्राप्त होतील, असे जिल्ह निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले़
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ मतदारांची आकडे जुळवाजुळवी सुरू झाली असून, मतदार याद्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्या आहेत़ मतदारयादींवरून निवडणुकीचा अंदाज बांधला जात आहे़त्यात नव्याने ११ हजार मतदारांची भर पडली आहे़ पुरवणी यादी मतदारयादी लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे़
नव्याने मतदार नोंदणी मोहिमेस कार्यकर्त्यांनीही हातभार लावला़ त्यामुळे ही मतदार नोंदणी झाली असून, काही मतदारसंघाने हजारांचा आकडा पार केला आहे़ तर काही मतदारसंघात ५०० मतदारांची नोंदणी होऊ शकलेली नाही़ अखेरची संधी असूनही नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याने अपेक्षेपेक्षा कमीच मतदार नोंदणी झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)