संगमनेरमध्ये फी न भरल्याने विद्यार्थिनीचा पेपर हिसकावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:04 PM2018-04-03T17:04:02+5:302018-04-03T17:04:57+5:30

विद्यालयाची उर्वरित पाचशे रूपये फी न भरल्याने चित्रकला विषयाची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थिनीच्या हातातून पेपर हिसकावून घेण्याचा धक्कादायक प्रकार नगर रस्त्यावरील ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी घडला.

Filling of fee in Sangamner, the student's paper was snapped | संगमनेरमध्ये फी न भरल्याने विद्यार्थिनीचा पेपर हिसकावला

संगमनेरमध्ये फी न भरल्याने विद्यार्थिनीचा पेपर हिसकावला

संगमनेर : विद्यालयाची उर्वरित पाचशे रूपये फी न भरल्याने चित्रकला विषयाची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थिनीच्या हातातून पेपर हिसकावून घेण्याचा धक्कादायक प्रकार नगर रस्त्यावरील ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी घडला. ही विद्यार्थिनी नऊ वर्षाची असून या घटनेचा तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला आहे. माझ्यासह इतर तेरा विद्यार्थ्यांनाही पेपर देऊ न दिल्याचे या विद्यार्थिनीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पूजा लक्ष्मण गिते ही ज्ञानमाता विद्यालयात इयत्ता पाचवीत शिकते. सोमवारी सकाळी साडेसात वाजता चित्रकलेची परीक्षा सुरू असताना प्राचार्य फादर पिटर खंडागळे यांनी वर्गात येऊन तिच्याकडे फी भरली अथवा नाही याची विचारणा केली. त्यानंतर फी न भरलेल्या पूजाचा पेपर त्यांनी हिसकावून घेतला. दोन हजार रूपयांपैकी दीड हजार रूपये भरल्यामुळे उर्वरित पाचशे रूपयांसाठी पेपर देऊ न दिल्याचे तिने सांगितले. घरी आल्यानंतर तिच्याकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिचे वडील लक्ष्मण गिते यांनी गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार केली. या घटनेचा मुलीच्या मनावर आघात झाला असून मुलीला काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची राहील, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

माझी मुलगी पूजा ज्ञानमाता शाळेत शिक्षण घेते. पाचवीसाठी प्रवेश घेताना दीड हजार रूपये शाळेत भरले होते. उर्वरित पाचशे रूपये फीबाबत शाळा प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नव्हती. तिचा चित्रकलेचा पेपर फादर पिटर खंडागळे यांनी हिसकावून घेतला.
- लक्ष्मण गिते, पूजाचे वडील.

फीच्या संदर्भात विद्यार्थ्यांना आम्ही वर्षभर सांगत आहोत. त्याची आम्ही त्यांना पावती देतो. काही पालकांनी दोन ते तीन वर्षांपासून फी भरली नाही. गरजू शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांना फी माफ केली आहे. पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत फी घेण्याचा निर्णय झाला आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही.
- फादर पिटर खंडागळे, प्राचार्य, ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय.

या विद्यार्थिनीचे अथवा कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही शाळा प्रशासनाला आदेश दिले आहेत.
- साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, संगमनेर.

Web Title: Filling of fee in Sangamner, the student's paper was snapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.