अखेर १२५ प्राथमिक शिक्षक परतले स्वगृही

By चंद्रकांत शेळके | Published: July 9, 2024 06:11 PM2024-07-09T18:11:51+5:302024-07-09T18:12:43+5:30

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्त्या : अनेकांना मिळाली सोयीची ठिकाणे

finally 125 primary teachers returned | अखेर १२५ प्राथमिक शिक्षक परतले स्वगृही

अखेर १२५ प्राथमिक शिक्षक परतले स्वगृही

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, मग नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता यामुळे आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यांतून बदलून आलेले १२५ प्राथमिक शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर मंगळवारी या शिक्षकांना आपापल्या तालुक्यांत रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली. नोकरीच्या पहिल्या दिवसांपासून हे शिक्षक परजिल्ह्यात कार्यरत होते. यातील काहींना १०, तर काहींना त्याहीपेक्षा अधिक काळ या जिल्ह्यांत झाले होते. अनेकजण कोकण, मुंबई अशा दूरवर कार्यरत होते. या शिक्षकांनी आपल्या जिल्ह्यात बदली मिळावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालवले होते. परंतु दरवर्षी मर्यादित जागा असल्याने सर्वांना सामावून घेता येत नव्हते.

यावर्षी मात्र या शिक्षकांना संधी मिळाली. त्यानुसार त्यांच्या जिल्ह्यातून ते कार्यमुक्तही झाले. परंतु नगर जिल्हा परिषदेत हजर होताना त्यांना लोकसभा निवडणूक व शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचा अडसर आला.

आता आचारसंहिता संपल्याने जिल्हा परिषदेने या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत ९ जुलै रोजी समुपदेशन प्रक्रिया पार पाडली. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय २३ मे २०२३ च्या तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने अहमदनगर जिल्ह्यात हजर झालेल्या १२५ प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना करण्यासाठी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी नियोजन करून मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समुपदेशन प्रक्रिया आयोजित केली. या प्रक्रियेमध्ये प्रथम पेसा क्षेत्रात इच्छुक असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. नंतर संवर्ग १ तसेच संवर्ग २ व शेवटी सर्वसाधारण या प्राधान्यक्रमाने हजर प्राथमिक शिक्षकांना सेवाजेष्ठतेनुसार पदस्थापना देण्यात आली. रिक्त जागा जास्त असल्याने अनेकांना यात आपापला तालुकाही मिळाला.

रिक्त जागांवर मिळणार शिक्षक

जिल्ह्यात सध्या प्राथमिक शिक्षकांची ४३६ पदे रिक्त आहेत. आता १२५ शिक्षकांना पदस्थापना दिल्याने शाळास्तरावर रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकांची नियुक्ती होऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवरील रिक्त्त पदांची संख्या कमी होणार आहे.

जिल्हांतर्गत बदल्यांबाबत संभ्रम

आंतरजिल्हाप्रमाणे जिल्हांतर्गत बदल्यांची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून होत आहे. त्यासाठी साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेले आहेत. परंतु त्याला अद्याप मुहूर्त लागलेेला नाही. काही जिल्ह्यांत अशा बदल्या झाल्या. मात्र नगर जिल्हा परिषद ही प्रक्रिया राबवणार आहे किंवा नाही? याबाबत शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
 

Web Title: finally 125 primary teachers returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक