अखेर २६५ शिक्षकांना मिळाली पदवीधर पदोन्नती, २२३२जणांचा पदोन्नतीस नकार
By चंद्रकांत शेळके | Published: November 22, 2023 09:48 PM2023-11-22T21:48:20+5:302023-11-22T21:48:32+5:30
भाषेला १४४, तर गणित-विज्ञानला मिळाले १२१ शिक्षक
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून केंद्रप्रमुखांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बुधवारी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली. यात भाषा विषयाचे १४४, तर विज्ञान-गणित विषयाचे १२१ अशा एकूण २६५ शिक्षकांना पदोन्नती मिळाली. त्यामुळे या विषयांना आता शिक्षक उपलब्ध होणार आहेत.
सोमवार (दि. २०) शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया ठेवली होती. यात ८९ मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी पदवीधर शिक्षकांची पदोन्नती होणार होती. त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी पात्र शिक्षकांना बोलावलेही होते. परंतु अचानक एक दिवसासाठी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर बुधवारी पदवीधर पदोन्नती प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
जिल्हा परिषदेतून तालुकास्तरावर ॲानलाईन झालेल्या या प्रक्रियेत एकूण २६५ शिक्षकांना पदोन्नती मिळाली. दरम्यान, भाषा विषयाचे १४४ व विज्ञान-गणित विषयाचे १६९ पदे उपलब्ध होती. यासाठी शिक्षण विभागाने सुमारे ३ हजारांहून अधिक पात्र शिक्षकांची यादी सेवाज्येष्ठतेनुसार जाहीर केली होती. त्यासाठी तालुकास्तरावर शिक्षकांना बोलावण्यात आले होते. प्रारंभी भाषा विषयासाठी २९६१ शिक्षकांच्या पात्र यादीतून १४४ जणांना पदोन्नती देण्यात आली. यात २१३० शिक्षकांनी गैरसोय व इतर कारणांनी नकार दिला. त्यानंतर विज्ञान-गणित विषयासाठी पात्र २२३ शिक्षकांमधून १२१ जणांना पदोन्नती मिळाली. यातही १०२ शिक्षकांना नकार कळवला.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल शेळके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे समुपदेशन करून सेवाज्येष्ठता यादीप्रमाणे पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली.