...अखेर अळकुटी परिसराला पूर्ण दाबाने मिळाले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:25+5:302021-04-26T04:18:25+5:30
अळकुटी : अखेर पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावांना पिंपळगाव जोगेचे आवर्तन पूर्ण दाबाने मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खासदार ...
अळकुटी : अखेर पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावांना पिंपळगाव जोगेचे आवर्तन पूर्ण दाबाने मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी समन्वय ठेवून कार्यकर्ते, अधिकारी यांच्याशी बोलून पूर्ण दाबाने पाणी मिळवून दिले, असा दावा पिंपगळगाव जोगे कालवा कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. भास्कर शिरोळे यांनी केला आहे.
पिंपळगाव जोगेच्या मागील आवर्तनाचे पाणी अळकुटी परिसरातील पाडळी आळे, पाबळ, लोणी मावळा आदी गावांना पूर्ण दाबाने मिळाले नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पाणीच मिळाले नव्हते. त्यामुळे येथील पाणीप्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर यामध्ये डॉ. सुजय विखे यांन लक्ष घातले. त्यांनी अळकुटी येथे ५ एप्रिल रोजी पाणी परिषद घेऊन अधिकारी आणि शेतकरी यांच्याबरोबरच चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी पिंपळगाव जोगेचे आवर्तन सोडल्यानंतर पाणी शेवटच्या लाभार्थ्याला मिळावे, यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लावली होती, असे डॉ. शिरोळे यांनी सांगितले. पाणी कालव्यातून सुरू झाल्यानंतर ते किती क्षमेतेने वाहत आहे, याकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी काही कार्यकर्त्यांनी नेमणूक केली होती. ते कार्यकर्ते प्रत्येक तासाला कालव्यातील पाणी किती दाबाने सुरू आहे, याची माहिती विखे यांना देत होते. त्यानंतर काही अडचण असल्यास विखे स्वत: अधिकाऱ्यांशी बोलत होते. त्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळाले, असे डॉ. शिरोळे यांनी सांगितले. यामुळे सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाले.
---
अळकुटी परिसरातील शेतकऱ्यांना पिंपळगाव जोगेचे आवर्तन उच्च दाबाने मिळाल्यामुळे सर्वांना पाणी मिळाले. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. यापुढेही खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली असेच नियोजन केले जाईल.
- डॉ. भास्कर शिरोळे
अध्यक्ष, पिंपगळगाव जोगे कालवा कृती समिती
---२५ पिंपळगाव जोगे
अळकुटी परिसरात पूर्ण क्षमतेने वाहणारा पिंपळगाव जोगे कालवा.