रूरबन योजना कामांच्या चौकशीसाठी अखेर समिती नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:37+5:302021-04-17T04:19:37+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील विविध गावातील रूरबन योजना कामांच्या चौकशीसाठी दोन उपअभियंता, अतिरिक्त गटविकास अधिकारी व विस्तार ...
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील विविध गावातील रूरबन योजना कामांच्या चौकशीसाठी दोन उपअभियंता, अतिरिक्त गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी अशा चौघा जणांची समिती नियुक्त केली आहे.
रूरबन योजनेंतर्गत मंजूर डीपीआरसह प्रशासकीय मान्यता आदेश खाडाखोड करून कामे बदलण्याबाबतच्या तक्रारी सुरू आहेत. यावरून २८ मार्चला शिवसेना महिला संघटक सविता ससे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बैठे आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलकांना दिलेल्या लेखी आश्वासनानुसार गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी नुकतेच चौकशी समिती नियुक्तीचे आदेश दिले होते.
तिसगाव रूरबन योजनेत निवडुंगे, पारेवाडी, देवराई, निंबोडी, शिरापूर, मांडवे, कासार पिंपळगाव, सोमठाणे, कौडगाव, श्री क्षेत्र मढी आदी गावे सामाविष्ट आहेत. मूळ आराखडे ऑनलाइन करताना या गावांना विश्वासात न घेता, यातील मंजूर कामे परस्पर रद्द करण्यात आली. कामे रद्द करण्यासह निधी कपात करताना कोणते निकष लावले. अशा तक्रारींच्या अनुषंगाने सर्वांगीण चौकशी करून १९ एप्रिल अखेर अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त मालिका प्रसिद्ध केली होती. आता चौकशी समिती काय अहवाल सादर करते. याकडे योजनेत समावेश असणाऱ्या गावांचे लक्ष लागले आहे.
--
मुख्यमंत्री पोर्टलवर रूरबनच्या ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत. आराखड्यात कामे मंजूर नसताना, जिल्हाधिकारी स्तरावरूनही पुढील प्रशासकीय मान्यता देण्यात आली, हे विशेष. चौकशी समितीने योग्य अहवाल न दिल्यास थेट न्यायालयात दाद मागू.
-आसाराम ससे,
ग्रामपंचायत सदस्य, निवडुंगे