तलाठी भरतीतील ‘त्या’ ११ डमींवर अखेर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:48 AM2021-03-12T01:48:58+5:302021-03-12T01:49:30+5:30
यासंदर्भात आता वर्षभरानंतर जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या सूचनेवरून सामान्य प्रशासनच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांनी ९ मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पावणेदोन वर्षांपूर्वी झालेल्या तलाठी भरतीत बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उमेदवार वेगवेगळ्या आठ जिल्ह्यांतील आहेत. जिल्ह्यातील ८४ तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान ॲानलाइन परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांनी ही परीक्षा आपापल्या जिल्ह्यातून ॲानलाइन दिली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९ रोजी १२५ जणांची प्रारूप यादी प्रशासनाने जाहीर केली. त्या उमेदवारांना ३ ते ७ जानेवारीदरम्यान कागदपत्रांच्या छाननीसाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो व प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात ११ उमेदवार डमी आढळले.
यासंदर्भात आता वर्षभरानंतर जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या सूचनेवरून सामान्य प्रशासनच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांनी ९ मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उमेदवार भंडारा, गडचिरोली, धुळे, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील आहेत.