अखेर केंद्रप्रमुखांच्या भरतीला मुहूर्त, नगरमधून भरणार १२३ पदे

By चंद्रकांत शेळके | Published: June 7, 2023 07:01 PM2023-06-07T19:01:41+5:302023-06-07T19:01:56+5:30

चंद्रकांत शेळके  अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांना प्रतिक्षा असलेल्या केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेतून भरली जाणार आहेत. १५ जूनपर्यंत ...

Finally the recruitment of Center chief is happening, 123 posts will be filled from the ahmednagar | अखेर केंद्रप्रमुखांच्या भरतीला मुहूर्त, नगरमधून भरणार १२३ पदे

अखेर केंद्रप्रमुखांच्या भरतीला मुहूर्त, नगरमधून भरणार १२३ पदे

चंद्रकांत शेळके 
अहमदनगर :
गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांना प्रतिक्षा असलेल्या केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेतून भरली जाणार आहेत. १५ जूनपर्यंत यासाठी शिक्षक ॲानलाईन अर्ज करू शकणार असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होणार आहे.

केंद्रप्रमुखाचे पद सरळसेवा भरतीतून, तसेच शिक्षकांमधून पदोन्नतीने व स्पर्धा परीक्षेद्वारे भरले जाते. पदोन्नतीने जिल्ह्यातील सर्व पदे भरलेली आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षेतून भरायची पदे रिक्त होती. ती आता भरली जाणार आहेत. महाराष्ट्र परीक्षा परिषदेने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात २३८४ पदे भरायची आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ६ ते १५ जूनपर्यंत आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात यासाठी परीक्षा होणार आहे. ती तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

कोण करू शकतो अर्ज
फक्त संबंधित जिल्हा परिषदेचे पात्र शिक्षक या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. न.प.,न. पा.,म.न.पा., खासगी संस्थांमधील शिक्षक अर्ज करण्यास पात्र नाहीत. संबंधित शिक्षक ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, तसेच जिल्हा परिषदेवर तीन वर्षे सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) झालेली हवी.

नगर जिल्ह्यात १२३ पदे भरणार
या परीक्षेतून राज्यात २३८४ पदे भरली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात १५४, रत्नागिरीत १२५, तर नगर जिल्ह्यात १२३ पदे भरली जाणार आहेत.

जिल्ह्यात ७० टक्के पदे रिक्त
जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच केंद्रप्रमुखाला इतर केंद्रांचाही अतिरिक्त भार सांभाळावा लागत आहे. जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची अडीचशे पदे मंजूर आहेत. शासन निर्णयानुसार एकूण पदांपैकी ४० टक्के पदे सरळसेवेतून, ३० टक्के स्पर्धा परीक्षेतून, तर उर्वरित ३० टक्के पदे पदोन्नतीने भरली जातात. जिल्ह्यात पदोन्नतीने सर्व म्हणजे ७६ पदे भरलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेवढीच पदे भरलेली होती. सरळसेवेची ९८, तर स्पर्धा परीक्षेतून भरायची ७४ पदे रिक्तच होती. पैकी स्पर्धा परीक्षेतून आता १२३ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे बराचसा अनुशेष भरून निघणार आहे.

Web Title: Finally the recruitment of Center chief is happening, 123 posts will be filled from the ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.