'हिरण यांच्या मारेकऱ्यांना शोधून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:31 AM2021-03-09T02:31:24+5:302021-03-09T02:31:58+5:30

विजय दर्डा यांची गृहमंत्र्यांकडे मागणी : जैन महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन

Find the deer killers and give justice to the minority community | 'हिरण यांच्या मारेकऱ्यांना शोधून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्या'

'हिरण यांच्या मारेकऱ्यांना शोधून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्या'

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील प्रथितयश व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झाले व नंतर त्यांची हत्या झाली. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलून अल्पसंख्य समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माजी खासदार व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी केली आहे.
१ मार्च रोजी हिरण (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांचे अपहरण झाले. मात्र, पोलीस त्यांची सुटका करू शकले नाहीत. त्यानंतर ७ तारखेला सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेचा राज्यातून निषेध होत आहे. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना विजय दर्डा म्हणाले, ही घटना वेदनादायी आहे. पोलीस दलाने घटनेच्या मुळापर्यंत जाऊन सूत्रधारांचा शोध घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघानेही या घटनेचा निषेध केला असून, बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिरण यांचे अपहरण झाल्यापासून जैन अल्पसंख्याक महासंघ राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होता व तपासासाठी आग्रही होता. दुर्दैवाने तपास न होता हिरण यांचा मृतदेहच मिळाला. हे पोलिसांचे अपयश व निष्क्रियता असल्याची व्यापारी समाजाची भावना आहे. आरोपी व सूत्रधारांना अटक होण्याच्या मागणीसाठी १० मार्च रोजी संपूर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने केली जाणार आहेत. तसेच व्यापारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. एक आठवड्यात खुन्यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण देशात आंदोलन उभारण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे.

हत्येप्रकरणी दोघांना अटक
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याप्रकरणात सोमवारी पोलिसांनी शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Find the deer killers and give justice to the minority community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.