अहमदनगरमध्ये मोक्कार फिरणाऱ्यांकडून एक कोटीचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 18:52 IST2021-05-29T18:51:39+5:302021-05-29T18:52:01+5:30
नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ५६ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी १ लाख ५३ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अहमदनगरमध्ये मोक्कार फिरणाऱ्यांकडून एक कोटीचा दंड वसूल
अहमदनगर : नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ५६ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी १ लाख ५३ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने मार्चपासून कडक निर्बंध लागू केले. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्यासह कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखेकडू नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. शहरात दररोज चौकाचौकात नाकाबंदी करून ही कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे, विनाकारण बाहेर फिरणे, मोटरसायकलवर डबलसीट जाणे, विनामास्क, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, दुकाने उघडी ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.
दहा दिवसात ४८०० जणांची कोरोना चाचणी
शहरात विनाकारण फिरणाऱ्या ४ हजार ८०० जणांची पोलीस व आरोग्य पथकाने कोरोना चाचणी केली. १७ मे पासून या मोहिमेला सुरुवात झाली होती. कोरोना चाचणीसह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १७० जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.