बेकायदा झाडे तोडल्याप्रकरणी चार हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:51 AM2021-01-13T04:51:06+5:302021-01-13T04:51:06+5:30
भिंगार : नागरदेवळे (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरातील निलगिरी, बाभूळ, कडूलिंब असे आठ ते दहा झाडे ...
भिंगार : नागरदेवळे (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरातील निलगिरी, बाभूळ, कडूलिंब असे आठ ते दहा झाडे बेकायदा तोडल्यामुळे नगरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी संबंधितांना चार हजारांचा दंड ठोठावला आहे.
याबाबत संजय दळवी यांनी वनविभागाकडे पत्राद्वारे तक्रार नोंदविली होती. शालेय समितीचे अध्यक्ष आयुष पठाण, सरपंच राम पानमळकर, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत पाखरे, शाळेचे मुख्याध्यापक यांच्या सांगण्यावरून २९ ऑक्टोबर २०२० रोजी झाडे तोडण्यात आली व त्यांची विक्री करण्यात आली. झाडे तोडण्याबाबत शालेय समिती अध्यक्ष आयुष पठाण यांना ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर संजय दळवी यांनी वनविभागाला पत्राद्वारे बेकायदा वृक्षतोडबाबत तक्रार केली. त्यानंतर वनविभागाने झाडे तोडल्याप्रकरणी ४ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.