विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांकडून साडेआठ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:10+5:302021-05-05T04:34:10+5:30
शेवगाव : दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात शेवगाव पोलिसांनी धडक मोहीम ...
शेवगाव : दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात शेवगाव पोलिसांनी धडक मोहीम राबविली आहे. विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या १ हजार १६ तर विनाकारण फिरणाऱ्या २ हजार ४३४ जणांवर दंडात्मक कारवाई करताना ८ लाख ४४ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.
२० फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत सदरचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना काळातील नियमांची अंमलबजावणी करताना, शहरात विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणारे, तसेच विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी शेवगाव पोलिसांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक, तसेच पैठण रोडवरील नित्यसेवा चौक येथे पथक तैनात करण्यात आले आहेत. याचबरोबर, शहर व ग्रामीण भागात गस्त घालण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे.
अपुरे संख्या बळ लक्षात घेऊन पोलिसांच्या मदतीला मुख्यालयातील अतिरिक्त पाच पोलीस कर्मचारी व कोरोना काळातील बंदोबस्तासाठी गृहरक्षक दलाचे १० होमगार्ड अशी अधिकची कुमक देण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या पथकाने दंडात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे.
एकीकडे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असताना, दुसरीकडे नियम धाब्यावर बसवून जुजबी कारण देत, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.