साई मंदिरातील दानपेटीला आग, याबाबत पूर्णत: बाळगली गोपनीयता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:51 AM2017-11-02T00:51:31+5:302017-11-02T00:51:38+5:30
केंद्रीय परिवहन व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी साई मंदिरात असतानाच सार्इंच्या दान पेटीला आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
शिर्डी : केंद्रीय परिवहन व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी साई मंदिरात असतानाच सार्इंच्या दान पेटीला आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
रविवारी गडकरी साईदर्शनासाठी आले होते. दुपारच्या माध्यान्ह आरतीला ते उपस्थित होते. आरती घेतल्यानंतर ते मंदिरातील व्हीआयपी कक्षात गेले. त्यानंतर आरतीचे तबक या कक्षाच्या अगदी समोर समाधीच्या मागील बाजूस ठेवण्यात आले.
मात्र पुजा-याचा चुकून धक्का लागल्याने पेटती वात पेटीच्या पैसे टाकण्याच्या छिद्रातून आत जाऊन नोटांचा धूर बाहेर आला. कर्मचा-यांनी तातडीने त्यात पाणी ओतले.
मात्र त्यानंतरही थोडा धूर येत असल्याने दरम्यानच्या काळात तेथे पोहचलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी दान पेटीत पावडर फवारणी केली. मात्र तातडीने ही पेटी तेथून हलविण्यात आली. याबाबत पूर्णत: गोपनीयता बाळगण्यात आली.
सोमवारी पेट्या उघडल्यानंतर त्यात अडीच लाख रूपये निघाले. त्यातील दोन हजार नऊशे रूपयांच्या नोटांना आगीची धग लागल्याचे उघड झाले. दान पेट्यांचा विमा असल्याचेही कळते.