क्रिकेट सामन्यातील नो बॉलवरून गव्हाणेवाडीत गोळीबार; दोनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:24 PM2018-01-23T17:24:38+5:302018-01-23T17:25:17+5:30
नगर-पुणे रोडवरील गव्हाणेवाडी (ता़ श्रीगोंदा) येथे क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकला म्हणून मंगळवारी दुपारी काळे व गव्हाणे गटात मारामारी झाली. त्यानंतर काही वेळातच गोळीबार करण्यात आला.
श्रीगोंदा : नगर-पुणे रोडवरील गव्हाणेवाडी (ता़ श्रीगोंदा) येथे क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकला म्हणून मंगळवारी दुपारी काळे व गव्हाणे गटात मारामारी झाली. त्यानंतर काही वेळातच गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात निलेश काळे व दादा गव्हाणे हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
गव्हाणेवाडी गावातील मोटे वाडी येथे ओम साई तरुण मंडळाने क्रिकेटचे सामन्याचे आयोजन केले होते. सामन्यात मंगळवारी दुपारी नो बॉलवरून वाद झाला. या वादात रुपांतर हाणामारीत झाले. दादा गव्हाणे याने निलेश काळे याचा मावस भाऊ अक्षय काळे याला मैदानात हाणमार केली. त्यावरुन दोन गटात तुंबळ मारामारी झाली. ही घटना दुपारी अडीच वाजता झाली. या हाणामारीनंतर ओमसाई तरुण मंडळाचे कार्यकर्ते पळून गेले.
त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निलेश काळे व दादा गव्हाणे हे गावठी कट्टे घेऊन समोरासमोर भिडले. एकमेकांवर गोळीबार करण्यात आला. यात निलेश काळे याला गोळी लागली तर दादा गव्हाणे याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ घटनास्थळी दाखल झाले.