शहरविकासातील फिरोदिया घराणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:17 PM2019-08-17T15:17:43+5:302019-08-17T15:19:44+5:30

असहकार आंदोलन, पदवी  त्याग आंदोलन, न्यायालय आणि सरकारी शाळेवर बहिष्कार , खादी प्रचार  कार्य, हिंदू - मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, नशाबंदी यात काम करणारी एक फळी कुंदनमल तथा भाऊसाहेब फिरोदिया यांनी घडविली. त्यांची मुले नवलमल, हस्तीमल आणि मोतीलाल यांनीही त्यांचा वारसा वृद्धिंगत केला.

The Firodiya family in the city's development | शहरविकासातील फिरोदिया घराणे 

शहरविकासातील फिरोदिया घराणे 

अहमदनगर : कोणत्याही गावाच्या किंवा  शहराच्या विकासात, जडणघडणीत काही द्रष्ट्या व्यक्तींची महत्त्वपूर्ण भूमिका असते. अहमदनगर शहराच्या विकास आणि वाटचालीत फिरोदिया परिवाराची कार्यमुद्रा उमटली आहे. स्वातंत्र्याची चळवळ, शिक्षण, समाजकारण, सहकार, अर्थकारण सांस्कृतिक आणि क्रीडा विकासात फिरोदिया परिवाराने दिलेले निरलस योगदान असामान्य आहे.
कुंदनमल सोभाचंद तथा भाऊसाहेब  फिरोदिया १९०६ साली पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात  शिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारावले आणि स्वातंत्र्य चळवळीशी  जोडले गेले. १९०८ साली पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रज धार्जिण्या लोकांनी एक वादविवाद स्पर्धा भरवली. विषय होता - ‘ईस्ट इंडिया कंपनी; भारतास वरदान!’ कुंदनमल यांचे स्पष्ट उत्तर होते-  ‘ईस्ट इंडिया कंपनीमुळे हिंदुस्थानचा काहीही फायदा झाला नाही. उलट देशाची आर्थिक लूट होऊन देशाचा अस्मिताभंग झाला.’
आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी भाऊसाहेबांनी एकदम जहाल भाषण ठोकले़ त्यामुळे त्यांचे बक्षीस गेल़े परंतु राष्ट्रवादी विचारांचा युवक म्हणून पुणे येथील विद्यार्थी चळवळीत त्यांची ओळख तयार झाली. एका परतंत्र देशात कोणीही भारतीय सन्मानाने जगू शकणार नाही, असा स्पष्ट विचार करून भाऊसाहेबांनी  स्वातंत्र्य लढ्याचे व्रत स्वीकारले.
पदवी मिळाल्यानंतर  एलएलबी (वकिली अभ्यासक्रम) शिकण्यासाठी ते  मुंबईत गेले. जैन समाजातील ते पहिले वकील बनले. त्यांच्या कुटुंबात त्यांनी सर्वांना देशभक्त्तीचे व्रत दिले. विदेशी साखर न खाता बनारसी देशी साखर खाणे, केवळ खादी वापरणे, सर्व जाती धर्मातील लोकांशी आप्त स्वकीय समजून वागणे, सत्याग्रहात सहभाग या परंपरा फिरोदिया कुटुंबात त्यांनी निर्माण केल्या. नगर जिल्ह्यात स्वातंत्र्य चळवळीचा पाया व्यापक करण्यासाठी  आणि होमरूल आंदोलन तळागाळात नेण्याचे १९१६ साली नगर शहरात हरिभाऊ पटवर्धन (अच्युतराव आणि रावसाहेब पटवर्धन यांचे वडील) व भाऊसाहेबांनी ठरवले. अध्यक्ष म्हणून नरसिंह चिंतामण तथा  तात्यासाहेब केळकर यांना बोलवले.
लोकमान्य टिळकांना निमंत्रण देण्यासाठी भाऊसाहेब आणि हरिभाऊ  लोकमान्यांना भेटले. आपण नगरला येत असल्याचे टिळकांनी लगेच सांगून  टाकले. लोकमान्य टिळकांच्या २६ ते ३१ मे १९१६ दरम्यानच्या वास्तव्य आणि  भेटीमुळे अहमदनगर जिल्हा स्वातंत्र्य चळवळीचे एक अग्निकुंड बनला. नगरच्या इमारत कंपनीत टिळक यांनी स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क पुन्हा एकदा बजावून सांगितला. त्यामुळे टिळक यांच्यावर राजद्रोहाचा तिसरा खटला इंग्रजांनी दाखल केला. लोकमान्य टिळक यांचे वकीलपत्र बॅरिस्टर जीना यांनी घेऊन ही केस ते लढले आणि जिंकले.
शेतकºयांचा शेतसारा  वाढवू नये, याबाबत भाऊसाहेब यांनी यशस्वी प्रयत्न केले. लोकमान्यांच्या  आदेशानुसार त्यांनी होमरुल या विषयावर व्याख्याने दिली. त्याबद्दल सरकारने त्यांच्यावर केस दाखल केल्या. बॅरिस्टर मोहमदअली जीना यांनी केस लढविल्यामुळे तेदेखील  निर्दोष सुटले.
१९१६ साली लखनऊ येथील राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाला नगर जिल्ह्यातून भाऊसाहेब आणि हरिभाऊ पटवर्धन ४० कार्यकर्त्यांना घेऊन गेले. त्यावेळेस प्रथमच बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांची भेट झाली. १ आॅगस्ट १९२० रोजी टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीचा टिळकांचा वारसा पेलणाºया महात्मा गांधींसोबत त्यांचे भावबंध जुळले.
दरम्यान भाऊसाहेब नगरच्या  नगरपालिकेत सदस्य म्हणून   निवडून  आले. १९१८ च्या दुष्काळात प्रथमच दुभत्या जनावरांचे कॅम्प ( छावण्या) त्यांनी सुरू केले़ त्याचवेळी नगर जिल्ह्यामध्ये इन्फ्ल्यूंझाची साथ होती. एक दिवसात काही शेकडा लोक या रोगाला बळी पडत होते़ मृतदेह उचलण्यास माणसे मिळत नव्हती़ या परिस्थितीत भाऊसाहेबांनी स्वयंसेवकाची एक फळी उभारून वैद्य गंगाधर शास्त्री गुणे  यांच्या मदतीने घरोघरी जाऊन औषधोपचार दिले.
नगर जिल्ह्यातील जाणते पुढारी हरिभाऊ पटवर्धन, बाळासाहेब भालेराव, सी. पी. जोशी यांचा सहवास आणि महात्मा गांधी यांची प्रेरणा यातून भाऊसाहेबांची राजकीय जडणघडण झाली. १९२७ साली प्रांतिक  काँग्रेसचे अधिवेशन नगरला भरवण्यात भाऊसाहेब अग्रणी होते.
असहकार आंदोलन, पदवी त्याग आंदोलन, न्यायालय आणि सरकारी शाळेवर बहिष्कार, खादी प्रचार कार्य, हिंदू - मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, नशाबंदी यात काम करणारी एक फळी भाऊसाहेब यांनी निर्माण केली.
१९४० साली भाऊसाहेब अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. यावेळी प्रथमच जनता दरबार घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 
१२ जानेवारी १९४० रोजी इंग्रज विरोधी सत्याग्रह केल्याने त्यांना ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यांचे नगरपालिकेचे सभासदत्व आणि अध्यक्षपद रद्द करण्यात आले़ यामुळे भाऊसाहेब अजून निग्रही झाले.
अहमदाबाद अधिवेशनातील काँगे्रसच्या निर्णयानुसार भाऊसाहेबांनी इंग्रजांविरोधात जाहीर सभांतून एल्गार पुकारला़ त्यामुळे इंग्रजांनी त्यांची वकिलीची सनद काही महिन्यांसाठी  रद्द केली. माफी मागून त्यांची ही शिक्षा रद्द करण्यास इंग्रज तयार होते़ मात्र, करारी भाऊसाहेबांनी माफी मागण्यास नकार दिला़ उलट इंग्रजांच्या व्यापार नीतीविरोधात नगरमध्ये भाऊसाहेबांनी स्वदेशी मालाचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र सुरु केले़ पत्रकार आणि नाटककार कृष्णाजी खाडिलकर, जमनादास मेहता, जमनालाल बजाज यांनाही त्यांनी नगरमध्ये आणले.

नवलमल, हस्तीमल आणि मोतीलाल 
नवलमल, हस्तीमल आणि मोतीलाल ही कुंदनमल उर्फ भाऊसाहेब यांची ३ कर्तबगार मुले. नवलमल यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले. १९४२ मध्ये ‘चले जाव’ आंदोलनात   केलेल्या एका भाषणामुळे नवलमल यांना ८ महिन्याची शिक्षा  झाली. यावेळी तुरुंगात मुंबई प्रांताचे पुढे मुख्यमंत्री झालेले बाळासाहेब खेर यांचा सहवास नवलमल यांना मिळाला. या वडील आणि मुलाची जोडी स्वातंत्र्यासाठी एकाच वेळी मैदानात उतरली. 
भाऊसाहेब यांनीही  नगरपालिका, अर्बन बँक व इतर अनेक  संस्थांवरील पदांचा राजीनामा दिला आणि सत्याग्रह केला. सहा महिन्यासाठी त्यांचीही रवानगी  येरवडा तुरुंगात झाली. भाऊसाहेब आणि  नवलमल एकाच वेळेस येरवड्यात तुरुंगवास भोगत होते.
भाऊसाहेबांनी मोठ्या प्रयत्नांनी नगर अर्बन  बँक  नफ्यात  आणली. विधवा, अज्ञान यांच्या ठेवीवर जास्त व्याज देण्याची पद्धत त्यांनीच प्रथम सुरू केली. अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि वल्लभभाई पटेल अटकेत असताना भाऊसाहेब यांच्या घरून त्यांच्यासाठी जेवणाचा डबा जात असे. जेव्हा ही मंडळी तुरुंगातून सुटली, तेव्हा  जाताना भाऊसाहेबांच्या घरी आभार मानून गेली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे  १९४६ साली मुंबई प्रांताच्या विधीमंडळाचे अध्यक्ष  म्हणून  भाऊसाहेबांची बिनविरोध निवड झाली़ येथून पुढे राष्ट्रीय राजकारणात फिरोदिया परिवाराचे नाव आदराने घेतले जाऊ लागले. नवलमल यांच्यावरही गांधी विचारांचा पगडा होता़ स्वत:च्या लग्नात फक्त खादीचे कपडे, बाशिंग बांधणार नाही, मिरवणूक काढणार नाही, हे नियम टाकून त्यांनी लग्नास मान्यता दिली. नवलमल यांचे बंधू मोतीलाल आणि हस्तीमल हेही उच्च शिक्षित होते.
मोतीलाल  बी. ए. झाले.  हस्तीमल बी.ई. अभियांत्रिकी शिकून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. मारवाडमधून  महाराष्ट्रात आलेल्या फिरोदिया परिवारातील नवलभाऊ, मोतीभाऊ, हस्तीमल हे पाचव्या पिढीचे प्रतिनिधी. नवलभाऊंनी वडिलांप्रमाणेच वकिली व्यवसायात मोठे नाव मिळवले. कायद्याचे ज्ञान, चिंतन आणि सचोटी यामुळे वकिली व्यवसायात आपल्या वडिलांप्रमाणे त्यांचा दबदबा तयार झाला. भारताला  स्वातंत्र्य मिळाल्यावर  नवलमल यांनी ओळखले की, आपल्या देशाला रोजगाराची गरज आहे़ अन्यथा स्वातंत्र्य पोकळ वासा ठरेल. रोजगार निर्मिती हे प्रचंड मोठे आव्हान होते. त्यासाठी ते कोलकाता येथे गेले. तेथे पोटासाठी मानवी रिक्षा चालविणाºया कुटुंबांना ते भेटले. हे  अमानवीय काम बंद व्हावे, असे नवलमल यांना वाटले़ 
त्यांनी बजाज कुटुंबीय सोबत घेऊन  आॅटो रिक्षा उत्पादनाला चालना दिली. बजाज आॅटो आणि बजाज टेम्पो हे उद्योग उभारण्यात नवलमल यांचा सिंहाचा वाटा होता. ‘आॅटो रिक्षा’ हा शब्दच नवलमल यांची निर्मिती आहे.
मोतीलाल फिरोदिया यांनी अहमदनगर येथे बंद पडत चाललेली एक फाउंड्री विकत घेऊन त्याचे ‘मॉर्डन फाउंड्री’ असे नामकरण केले. नवलभाऊंच्या मदतीने अहमदनगर येथे  उद्योगधंद्याचा पाया घातला. एका फाउंड्री कंपनीच्या तीन फाउंड्री कंपन्या झाल्या. व्यवसाय वाढत गेला.
मोतीलाल यांची मुले अशोक,  प्रकाश आणि शांतीकुमार हेही फाउंड्री व्यवसायात उतरले. यामुळे नगरमध्ये सुमारे ५०० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आणि फिरोदियांचे रोजगार निर्मितीचे स्वप्न पूर्ण झाले़
मोतीलाल यांनी सहकाराचा पाया मजबूत केला. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे संस्थापक - अध्यक्ष मोतीभाऊ  होते. या बँकेची भव्य इमारत त्यांनीच उभारली. १९६२ ते १९६७ या काळात ते नगरचे खासदार होते. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी हे तिन्ही पंतप्रधान त्यांच्या 
कामाचा आदर बाळगून होते. तरीही १९६७ साली काँग्रेसची मिळालेली उमेदवारी त्यांनी नाकारली. इतर लायक लोकांनाही संधी मिळावी, असे त्यांनी श्रेष्ठींना सांगितले. नगरमधील पांजरपोळ, कुष्ठधाम, वृद्धाश्रम या संस्थात मोतीलाल यांनी भरीव कार्य केले. त्याकाळी महारोगाबद्दल  असणारी घृणा, लोकांचे गैरसमज पाहून त्यांनी कुष्ठधामची निर्मिती केली. काळाची पावले ओळखून  महाराष्ट्रातला पहिला  वृद्धाश्रम  त्यांनी  स्थापन केला.
हस्तीमल फिरोदिया भारतात आले आणि नवलभाऊंच्या व्यवसायात मदत करू लागले. परंतु आपणाला उद्योग क्षेत्रात काम करावयाचे असेल तर नवीन तंत्रज्ञान शिकणे गरजेचे आहे, हे त्यांनी जाणले. मुंबई सरकारच्या दापोडीतील कार्यशाळेत उपअभियंता  म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
एकवेळ अशी आली की, दापोडी वर्कशॉपमध्ये अ‍ॅक्टिंग वर्क्स मॅनेजर म्हणून त्यांच्या हाताखाली सुमारे २ हजार कामगार काम करत होते.  १९५७ साली त्यांनी उद्योग मंत्रालयाकडून टेम्पो, थ्री व्हीलर बनवण्याचा परवाना मिळवला. मग हस्तीमल यांनी नोकरीचा राजीनामा दिला. परंतु त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची विनवणी करून, समाजहिताचा उद्देश सांगून हा राजीनामा मंजूर करून घेण्यात आला.
१९५७ सालच्या डिसेंबर महिन्यात हस्तीमल हे नवलभाऊंच्या उद्योगात येऊन सामील झाले. काही मतभेदानंतर फिरोदिया कुटुंब बजाज आॅटोमधून बाहेर पडले. त्यानंतर कायनेटिक कंपनीशी तांत्रिक करार करून अहमदनगरमध्ये मोपेडची निर्मिती सुरू केली. फिरोदिया यांची  ‘लुना’ ही वाहन उद्योगातील क्रांती होती. अगदी सहज, सोपी आणि स्वस्त अशी ही लुना भारतामध्ये प्रसिद्ध झाली. या कारखान्यामुळे नगरचे जीवनमान उंचावले़ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जवळपास २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला. नवे उद्योग उभे राहिले. नगरपालिकेचा सर्व खर्च कायनेटिक कंपनीतून येणाºया जकातीवर अवलंबून असायचा. नगरमधील उद्योगांचा खरा पाया हस्तीमल यांनी रचला. 
कायनेटीक कंपनीने नगरमधील त्यावेळी हजारो तरुणांना रोजगार दिला. सध्या फिरोदिया परिवारातील विविध उद्योगांमध्येही हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. नवलभाऊ फिरोदिया यांनी रचलेला उद्योगांचा वारसा त्यांची पुढील पिढी समर्थपणे वृध्दींगत करत आहे.

शिक्षण, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात फिरोदिया यांचे काम
अहमदनगरमध्ये मोतीभाऊ  यांची मुले शांतीकुमार, प्रकाश आणि अशोक यांनी सर्वच क्षेत्रात  भरीव कामगिरी केली. शैक्षणिक क्षेत्रात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या  भाऊसाहेब फिरोदिया आणि इतर  विद्यालयांद्वारे  सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले. त्यासह फिरोदिया ट्रस्टद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच सामाजिक सेवेचा उद्योगांचा पुढील पाया नरेंद्र, विक्रम आणि गौरव ही फिरोदिया परिवाराची आजची तरुण पिढी चालवित आहे. शैक्षणिक क्षेत्रात छायाताई अहोरात्र काम करीत आहेत. नरेंद्र फिरोदिया हे अनेक उपक्रमांद्वारे अहमदनगर शहराची प्रतिमा बदलण्यासाठी धडपडताना दिसतात. क्रीडा, शिक्षण, आरोग्य या तिन्ही क्षेत्रात गरजवंतांना मदत करण्यास ते  उभे असतात. माझ्या पूर्वजांनी या स्थितीत  काय विचार केला असता, हा विचार करून मी माझे काम करतो, असे नरेंद्र फिरोदिया सांगतात.
१८८५ ते आजपर्यंत आणि पुढील येणा-या काळातही फिरोदिया कुटुंब  अहमदनगरची शान, प्रतिष्ठा आणि भविष्य असणार यात शंका नाही.

लेखक : संजय हरकचंद गुगळे (सामाजिक कार्यकर्ते)

Web Title: The Firodiya family in the city's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.