राज्याचे पहिले सहकारमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 05:05 PM2019-08-19T17:05:25+5:302019-08-19T17:05:29+5:30

१९५२ साली प्रजासत्ताकानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये शेवगाव-नेवासा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून बाळासाहेब भारदे निवडून आले.  बाळासाहेब पुन्हा १९५७ साली अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानमंडळावर निवडून आले. याच काळात ते महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. तथापि मुख्यमंत्रीपदी मराठी माणूस नेमण्याचा जेव्हा प्रश्न आला, तेव्हा त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या बाजूने त्यांची ताकद उभी केली. चव्हाण यांच्या पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळामध्ये बाळासाहेबांना कॅबिनेट मंत्रिपद लाभले व राज्याचा पहिला सहकारमंत्री होण्याचा मान मिळाला.

 First Assistant Minister of State | राज्याचे पहिले सहकारमंत्री 

राज्याचे पहिले सहकारमंत्री 

अहमदनगर : ज्ञानेश्वरीचे पहिले भाष्यकार शिवरामपंत भारदे यांचे सुपुत्र त्र्यंबक शिवराम ऊर्फ बाळासाहेब भारदे (दादा) मूळचे शेवगावचे. संत साहित्याचा अभ्यास व नाथांच्या सानिध्यातील वारकरी चळवळीचे बाळकडू त्यांना बालपणीच लाभले. वकिलीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेवगावीच प्रॅक्टीस सुरू केली. तथापि कुटुंबातील सामाजिक, राजकीय आत्मभानाने त्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये खेचले. अनेक सहकाºयांसह पटवर्धन बंधुंच्या नेतृत्वाखालील अहमदनगर जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनात बाळासाहेबांनी सक्रिय सहभाग नोंदवला. लाठ्याकाठ्या झेलल्या, तुरुंगवास भोगला. तथापि या शाळेतच त्यांना गांधी नावाच्या महात्म्याचा परिसस्पर्श झाला. गांधी विचाराने भारलेली बाळासाहेबांची पिढी समाजकारण, राजकारणामध्ये सक्रिय झाली. बाळासाहेब भारदे संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. अनेक संतवचने अखेरपर्यंत त्यांच्या मुखोद्गत होती. 
तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. स्व. रावसाहेब पटवर्धन यांनी नगर येथे सुरू केलेल्या ‘संघशक्ती’ या वृत्तपत्राची धुरा त्यांच्यानंतर बाळासाहेबांकडे आली. अजोड युक्तिवाद आणि दृढ गांधीवादी विचारसरणीने त्यांनी ‘संघशक्ती’ची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांचे लेखन व संपादकीय विचारांचा खरे तर अभ्यासकांनी नीटपणे अन्वयार्थ लावण्याची गरज आहे. वृत्तपत्रांच्या विशेषत: जिल्ह्यातील वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास त्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तत्कालीन महाराष्ट्राचे केरळ म्हणून ओळखल्या जाणाºया अहमदनगर जिल्ह्यातील ऐनभरातील कम्युनिस्ट चळवळीचा मुकाबला तरुण बाळासाहेब ‘संघशक्ती’च्या माध्यमातून कशा प्रकारे करीत होते हा महत्वपूर्ण विषय आहे. एका बाजूला प्र. कों. भापकर व दुसºया बाजूला बाळासाहेब भारदे हा वृत्तपत्रीय सामना त्या काळातील वाचकांची बौद्धिकभूक भागवणारा विषय होता.
१९५२ साली प्रजासत्ताकानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये शेवगाव-नेवासा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून बाळासाहेब निवडून आले. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानपर्यंतची गावे या मतदारसंघामध्ये होती. मोरारजी देसाई तेव्हा मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. ते द्वैभाषिक राज्य होते. बाळासाहेब पुन्हा १९५७ साली अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानमंडळावर निवडून आले. संयुक्त महाराष्टÑ समितीच्या कमलाबाई रानडे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या. याच काळात ते  महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते आणि भाऊसाहेब हिरे प्रदेशाध्यक्ष होते. तथापि मुख्यमंत्रीपदी मराठी माणूस नेमण्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या बाजूने त्यांची ताकद उभी केली. चव्हाण यांच्या पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळामध्ये बाळासाहेबांना कॅबिनेट मंत्रिपद लाभले व राज्याचा पहिला सहकारमंत्री होण्याचा मान मिळाला. जिल्ह्यातील सहकाराच्या आजच्या वटवृक्षाची लागवड त्याच काळात झाली, याला इतिहास साक्ष आहे. १९६७ साली बाळासाहेब पुन्हा भाई सथ्थांना पराभूत करून नगर शहरातून आमदार झाले. त्याच वर्षी ते विधानसभेचे सभापती म्हणून नियुक्त झाले. त्यानंतरच्या पंचवार्षिकला म्हणजे १९७२ मध्ये ते  शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून कॉ. ज. का. काकडे यांचा पराभव करून विजयी झाले. त्यांना पुन:श्च विधानमंडळाच्या सभापतीपदाची संधी मिळाली. तब्बल दहा वर्षे विधानमंडळाचे कामकाज सांभाळताना सभागृहामध्ये अनेक सभ्य आणि सुसंस्कृत अशा कामकाजाच्या प्रथा त्यांनी निर्माण केल्या. विधीमंडळ कामकाजाची त्यांची कारकिर्द सुवर्णाक्षराने लिहिली गेली आहे.
या यशाचे गमक होते बाळासाहेबांचे महात्मा गांधींच्या जीवन दर्शनाचे सम्यक आकलन. ‘धर्मनिष्ठ माणसाची खरी धर्मनिष्ठा केवळ वैयक्तिक शांतीसाधनेत नसून धर्मनिष्ठ समाजनिर्मितीच्या साधनेत आहे. धर्मकारणी माणसाने राजकारण करणे हा विसंवाद नसून तो खºया अर्थाने धर्मसंवादच आहे आणि ती धर्माची अवहेलना नसून सर्वश्रेष्ठ अशा विश्वधर्म वा मानवधर्माची परमोच्च उपासना आहे,’ असे बाळासाहेब म्हणत. स्वातंत्र्य चळवळीतून जडणघडण झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या पिढीचे राजकारणी म्हणून बाळासाहेबांकडे पाहिले पाहिजे. पटवर्धन बंधुंच्या विचाराने व गांधीवादाच्या संस्कारामध्ये या पिढीची जडणघडण झालेली होती. त्यांनी  सदैव चारित्र्यसंपन्न आणि उच्च दर्जाच्या नैतिक मूल्यांना महत्त्व दिले. लोभाला दूर लोटले आणि ढोंगाऐवजी सत्याचा आग्रह धरला.
 पुढे महाराष्टÑ खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अशाच कार्यकर्त्यांची जिल्हा मंडळे स्थापन करून वेगळ्या पद्धतीने ग्रामविकासाचे प्रयोग करावेत असे त्यांना मनोमन वाटत असे. मी तेव्हा शेवगावला कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक होतो. वडारवस्तीतील मुलांचा रात्रीचा अभ्यास, देहविक्रय करणाºया स्त्रियांच्या मुलांचे प्रश्न, मागासवर्गीय मुलांचे बोर्र्डिंग चालवणे असे उपक्रम आम्हा तरुणांना सोबत घेऊन करीत. माझ्या कामाविषयी कदाचित त्यांना समजले असावे. ते पाथर्डीला आले असता त्यांनी मला भेटीसाठी बोलावून घेतले व खादी ग्रामोद्योग मंडळावर संचालक म्हणून काम करण्याचा आग्रह केला. थोड्याच दिवसात कि. बा. हजारे, डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी मेबल आरोळे, लहू कानडे आणि माजी आमदार डॉ. एस. व्ही, निसळ अशी बोर्ड मेंबरची नियुक्ती झाल्याचे मला पत्र मिळाले. बाळासाहेब महाराष्टÑभर आम्ही करीत असलेल्या चिमूटभर सामाजिक कामाची तोंडभरून प्रशंसा करीत. 
कार्यकर्त्यांवर विलक्षण प्रेम करणे, त्याची सतत काळजी घेणे, त्याच्या सुख-दु:खात आवर्जून सहभागी होणे हा बाळासाहेबांचा खास स्वभाव होता. मी एरंडोलला प्रशिक्षणार्थी बीडीओ असताना एकदा ते भेटायला आले. ‘एक गाव निवडून इथे वेगळा प्रयोग कर’ असे त्यांनी सुचवले. शामखेडे नावाचे केवळ आदिवासी व अस्पृश्यांची वस्ती असणारे गाव निवडून आम्ही तेथे सार्वजनिक बायोगॅस व सर्व कुटुंबांना त्यावरील शौचालयाचा सक्तीने वापर करणेचा प्रयोग केला. तो कमालीचा यशस्वी झाला. 


लेखक : लहू कानडे(ज्येष्ठ साहित्यिक)

Web Title:  First Assistant Minister of State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.