आधी निरीक्षण मग अॅक्शन : ईशू सिंधू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:18 PM2019-03-06T12:18:10+5:302019-03-06T12:18:20+5:30
गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़
अरुण वाघमोडे
अहमदनगर : गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़ याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे़ आधी पूर्णत: निरीक्षण केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
सिंधू म्हणाले नगरचा पदभार स्वीकारून अवघे काही दिवस झाले आहेत़ कामाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याआधी हा जिल्हा आणि येथील प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे़ बदली होऊन गेलेले पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी येथील गुन्हेगारीविरोधात राबविलेल्या मोहिमा प्रभावी ठरल्या आहेत़
अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात काम करण्याचा मानस आहे़ याच अनुशंगाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योग्य त्या सूचना देण्याचे काम सुरू केले असल्याचे सिंधू म्हणाले़
पोलीस अधीक्षकांसमोरील आव्हाने
अवैध दारू विक्री
अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायातून दोन वर्षांपूर्वी नगर तालुक्यातील पांगरमल येथे दहा जणांना जीव गमवावा लागला होता़ सध्या खेडोपाडी गावठी दारू तयार करून विकली जात आहे़ याकडे उत्पादन शुल्क आणि स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष आहे़ लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम पोलिसांनी आणखी कडक करावी लागणार आहे़
वाळूतस्करांची दहशत
वाळूतस्करीतून जिल्ह्यात गुंडगिरी फोपावली आहे़ सध्या जिल्ह्यातील एकाही वाळू ठेक्याचा लिलाव झालेला नाही़ वाळूतस्कर मात्र अवैधरीत्या वाळूचा उपसा करून विक्री करत आहेत़ यातून महसूल पथकावर तर कधी ग्रामस्थांवर गुंडांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे़ वाळू वाहतूक करणाºया वाहनांखाली अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे़ महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविली तरच जिल्ह्यातील वाळूतस्करीला आळा बसणार आहे़
गावठी कट्यांची तस्करी
नगर जिल्ह्यात बिहार आणि मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात गावठी कट्यांची तस्करी होते़ अवघ्या दहा ते पंधरा हजार रुपयांना हे गावठी कट्टे विकले जात आहेत़ केडगाव आणि जामखेड येथील हत्याकांड गावठी कट्याच्या सहाय्यानेच झाले होते़ मध्यंतरी पोलिसांनी हत्यार तस्करीविरोधात व्यापक मोहीम राबविली होती़ ही हत्यार तस्करी मात्र थांबलेली दिसत नाही़
हद्दपारीचे अस्त्र वापरावेच लागेल
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ निवडणूक काळात राजकीय गुंडगिरीला उधाण येते़ गावापासून ते शहरापर्यंत राजकीय कारणातून वाद होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ निवडणूक काळात शांतता रहावी, यासाठी रंजनकुमार शर्मा यांनी वापरलेले हद्दपारीचे अस्त्र सिंधू यांनाही वापरावेच लागणार आहे़
परप्रांतीय टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखी
गेल्या तीन ते चार वर्षांपासून परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत़ गेल्या दोन वर्षांत अनेक परप्रांतीय टोळ्यांनी जिल्ह्यात चोरी, फसवणूक व दरोडे टाकले आहेत़ यातील काही टोळ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ या टोळ्यांचा उपद्र मात्र कमी झालेला नाही़