न्यायवैद्यकशास्त्राचे पहिले डिजिटल संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:29+5:302021-01-01T04:15:29+5:30

अहमदनगर : वैद्यकशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय अनेक गुन्ह्यांची उकल होत नाही. वैद्यकशास्त्रातील ज्ञान न्याय देण्यासाठी अचूक व महत्त्वाची भूमिका ...

The first digital museum of forensics | न्यायवैद्यकशास्त्राचे पहिले डिजिटल संग्रहालय

न्यायवैद्यकशास्त्राचे पहिले डिजिटल संग्रहालय

अहमदनगर : वैद्यकशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय अनेक गुन्ह्यांची उकल होत नाही. वैद्यकशास्त्रातील ज्ञान न्याय देण्यासाठी अचूक व महत्त्वाची भूमिका बजावते. हेच ओळखून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाउंडेशनमधील प्रा. डॉ. संदीप कडू यांनी भारतामधील न्यायवैद्यक शास्त्राचे पहिले डिजिटल म्युझियम साकारले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाला पेटंटही मिळाले आहे. पोलिसांपासून वकील व न्यायाधीशांनाही हे संग्रहालय मार्गदर्शक ठरणार आहे.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. संदीप कडू यांनी भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय (म्युझिअम) साकारले आहे. न्याय वैद्यकशास्त्र हा विषय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकवला जातो. अचूक व योग्य न्याय देण्यासाठी विद्यार्थ्यांना न्यायवैद्यकशास्त्र शिकवले जाते. डिजिटल संग्रहालय हे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, वैद्यकीय व्यावसायिक, वकील, न्यायाधीश यांना मार्गदर्शक व उपयोगी ठरणार आहे. वेगवेगळी हत्यारे, हत्यारांपासून होणाऱ्या इजा, विषारी पदार्थांची माहिती व उपाययोजना, विषारी सर्पाबद्दल माहिती उपलब्ध आहे. न्यायवैद्यक मॉडेल्स, गर्भातील वाढ, लैंगिक गुन्हे, एक्स-रे, अस्थी, छायाचित्रे, वैद्यकीय तक्ते यांच्याबद्दल सविस्तर माहिती या संग्रहालयात देण्यात आली आहे.

डिजिटल संग्रहालय तयार करण्यासाठी प्रा. राजकुमार सरोदे, श्रीराम झावरे, सुनील गारुकडकर, शोभा पवार, सुरेखा शेळके यांनी सहकार्य केले. न्याय देण्यासाठी न्याय व्यवस्थेला हे डिजिटल म्युझिअम मार्गदर्शक ठरणार असून, न्यायवैद्यकशास्त्रात पहिलाच प्रयोग असल्याचे कौतुकही पेटंट कार्यालयाच्या शासकीय जर्नलमध्ये केले आहे.

---

भारतामधील न्यायवैद्यकशास्त्राचे फॉरेन्सिक मेडिसीन म्युझिअम डिजिटल केल्याबद्दलचे पेटंट मिळाले. डिजिटल म्युझिअमबाबत ९ जून २०२० मध्ये अर्ज केला होता. पेटंट मिळाल्याची माहिती पेटंट ऑफिस जर्नलच्या २१ ऑगस्ट २०२० च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे डिजिटल संग्रहालय न्यायदानाच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

-डॉ. संदीप कडू, मेडिकल कॉलेज, विखे फाउंडेशन

-------------

फोटो- ३१ संदिप कडू

Web Title: The first digital museum of forensics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.