आधी कोरोनाशी लढला, त्याचा निष्प्राण देह असा रस्त्यावर पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:02 PM2020-07-23T12:02:16+5:302020-07-23T12:02:57+5:30
अहमदनगर : आधी कोरोनाशी लढला....लढता लढता मृत्यू झाला आणि त्याचा निष्प्राण देह असा रस्त्यावर पडला. नगरमध्ये जिल्हा रुग्णालयासमोरच ही घटना अनेक नागरिकांच्या समोरच घडली.
अहमदनगर : आधी कोरोनाशी लढला....लढता लढता मृत्यू झाला आणि त्याचा निष्प्राण देह असा रस्त्यावर पडला. नगरमध्ये जिल्हा रुग्णालयासमोरच ही घटना अनेक नागरिकांच्या समोरच घडली.
कोरोनाच्या महामारीत आरोग्य यंत्रणेच्या बेफिकरीने कळस गाठला आहे. अत्यंविधीसाठी नेत असलेला मृतदेह चालत्या वाहनातून रस्त्यावर पडला़ प्रत्यक्षदर्शींनी वाहनचालकाला थांबवून माहिती दिल्यानंतर घाईघाईत दोघांनी येऊन रस्त्यावर पडलेला मृतदेह उचलला़ नगरच्या जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर हा प्रकार मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला.
येथील जिल्हा रुग्णालयातून महापालिकेची रुग्णवाहिका (एमएच-१६, टी-१८१) मृतदेह घेऊन निघाली़ जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दारातून ही रुग्णवाहिका बाहेर पडली़ तेथून पुढे हाकेच्या अंतरावर गेल्यानंतर रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह मृतदेह खाली पडला़ स्ट्रेचरवरून मृतदेह रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर ये-जा करणारे घाबरून गेले़ काहींनी वाहनचालकाला थांबवून ही माहिती दिली़ मृतदेह खाली पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहनचालकासह गाडीतून दोघे उतरले़ त्यांनी रस्त्यावर पडलेला मृतदेह उचलून पुन्हा वाहनात ठेवला. हा मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधलेला होता़ ही घटना घडल्याने या रस्त्यावर भाजी-फळे विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण झाले.
हा मृतदेह नेमका कोविड बाधित होता की,बेवारस, याबाबत माहिती मिळू शकली नाही़ मात्र हा मृतदेह प्लास्टिकमध्ये पॅकबंद करण्यात आला होता. तसेच महापालिकेने ज्यांना कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम दिले आहे, त्यांच्याकडूनच हा प्रकार घडला. त्यामुळे सदरचा मृतदेह हा कोरोनाबाधिताचा होता, याला पुष्टी मिळते.
महापालिकेने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीचा ठेका खासगी संस्थेला दिला आहे़ याच व्यक्तीला कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचेही काम सोपविण्यात आलेले आहे. त्यामुळे याच संस्थेने हा मृतदेह अंत्यविधीसाठी चालविला होता, अशी माहिती आहे.