जिल्हाधिका-यांमुळे पहिल्यांदाच महापालिकेची सभा शिस्तीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 06:22 PM2018-07-20T18:22:10+5:302018-07-20T18:24:07+5:30
महपालिकेच्या सभेत आक्रमक बोलणारे, चेष्टा-मस्करी करून विषयाचे गांभीर्य घालविणारे, मुद्द्याऐवजी राजकारणावर बोलणा-या नगरसेवकांनी शुक्रवारच्या सभेत अभ्यासपूर्ण आणि शिस्तीत मांडणी केली.
अहमदनगर : महपालिकेच्या सभेत आक्रमक बोलणारे, चेष्टा-मस्करी करून विषयाचे गांभीर्य घालविणारे, मुद्द्याऐवजी राजकारणावर बोलणा-या नगरसेवकांनी शुक्रवारच्या सभेत अभ्यासपूर्ण आणि शिस्तीत मांडणी केली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी सभेला हजर राहिल्याने विषय सोडून सभा लांबविणा-या नगरसेवकांवरही चांगलाच अंकुश बसला. सीना नदी साफसफाई आणि महापालिकेला शिस्त लावल्याबद्दल सर्वच नगरसेवकांनी द्विवेदी यांच्या अभिनंदनाचा ठराव बाके वाजवून संमत केला.
महापालिका स्थापन झाल्यानंतरच्या १५ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी या पदावरील व्यक्ती महापालिकेच्या सभेला हजर राहिली. प्रभारी आयुक्त असलेल्या द्विवेदी यांनी सुरवातीलाच विषयांतर न करण्याची ताकीद देवून नगरसेवकांना पहिलाच दणका दिला. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी त्यांची मते अभ्यासपूर्ण, शांततेत आणि शिस्तीत मांडली. सभागृहातील अधिका-यांची विंग रिकामीच असल्याने गणेश भोसले यांनी यावर आक्षेप घेतला. महापौरांचा वचक राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. मात्र गाळ््यांचा एकच विषय सभेत असल्याने आणि अन्य विषयांवर चर्चा होणार नसल्याने अन्य अधिका-यांना सभेला बोलविले नाही, असा खुलासा द्विवेदी यांनी केला.
महापालिका स्थापन झाल्यापासून उपविधी तयार करण्यात आले नाहीत. असे नियम केले असले तर गाळेधारकांचा प्रश्न निर्माण झाला नसता असे सांगत दिलीप सातपुते यांनी गाळेधारक, अवैध बांधकाम करणारे महापालिकेच्या तिजोरीवर कसा डल्ला मारतात, याचा प्रवास सविस्तरपणे सांगितला. शौचालय पाडून गाळे बांधणा-या मार्केट कमिटीवर कारवाईची सातपुते यांनी मागणी केली. अनिल शिंदे यांनी गाळ््यांना रेडीरेकनरनुसार आकारले जाणारे भाडे अन्यायकारक असल्याने फेरसर्वे करण्याची मागणी लावून धरली. रेडीरेकनरची व्याख्या समजावून सांगण्याचा आग्रह सचिन जाधव यांनी सहायक नगररचना उपसंचालक राजेश पाटील यांच्याकडे लावून धरला.