शिर्डी विधानसभेचे पहिले आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 04:07 PM2019-08-17T16:07:13+5:302019-08-17T16:07:40+5:30

‘काँगे्रसवर अतिव निष्ठा असलेल्या चंद्रभान घोगरे पाटलांनी सत्तेचा मोह कधीच केला नाही’, अशा शब्दात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या आणि देशाच्या जडण-घडणीत ज्यांनी मोठे योगदान दिले, अशा शरद पवारांनाही ज्यांची स्तुती करण्याचा मोह आवरता आला नाही, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे चंद्रभान घोगरे पाटील. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार होऊनही घोगरे पाटलांनी नंतर पुन्हा सहकारातच काम करण्यास पसंती दिली.

First MLA of Shirdi Assembly | शिर्डी विधानसभेचे पहिले आमदार

शिर्डी विधानसभेचे पहिले आमदार

अहमदनगर : बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड या घराण्याशी चंद्रभान घोगरे पाटील यांच्या घराण्याचा जवळचा संबंध. घोगरे यांचे पणजोबा गायकवाड यांच्या संस्थानात वरच्या पदावर काम करत होते. त्यामुळे सुसंस्कार, दातृत्व, चारित्र्य या घरंदाज गोष्टींचा प्रभाव घोगरे कुटुंबावर झाला होता. पुढे हा वसा आणि वारसा चंद्रभान घोगरे पाटील यांच्यापर्यंत आला. त्यांनी केवळ तो जपला नाही तर आपल्या कर्तृत्वाच्या बळाने त्याच्यावर सोन्याचा कळस चढविला आहे. घोगरे यांचे कर्तृत्व मोठे. पण त्यांना कधीही ‘ग’ ची बाधा झाली नाही.
तत्कालीन श्रीरामपूर तालुक्यातील लोणी खुर्द हे गाव जिराईत भागात मोडणारे होते. त्यामुळे या गावातील शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून होती. दुष्काळ हा पाचवीला पूजलेला असायचा. अशावेळी चंद्रभान घोगरे पाटील यांच्या घरातील धान्याची कोठारे कायम गोरगरीब शेतकरी, दीनदलितांसाठी सदैव खुली असायची. आजही त्या काळातील हयात असलेली पिढी हे आवर्जून सांगते. नुसती सांगतच नाही तर चंद्रभान घोगरे पाटील म्हणजे आधुनिक ‘संत दामाजी’च असा उल्लेखही करते.
कोणताही समाज हा सुखी असावा, असे वाटत असेल तर त्यासाठी योगदानाची आवश्यकता असते. केवळ ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ असून चालत नाही. चंद्रभान घोगरे पाटील यांनी कृती अन् त्यागातून आपले कार्य समाजासाठी अर्पण केले. समाजाच्या दु:खात वाटेकरी होऊन समाजाचे दु:ख वाटून घेतले. त्यामुळे जिल्ह्याचा आणि विशेषत: प्रवरेच्या इतिहासाचा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा घोगरे पाटील यांची समाजसेवा व त्याग हा कृतीशिलतेने तेजोमय दिसतो.
१९४५-५०  या कालावधीत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांच्या साथीने  केलेल्या आशिया खंडातील पहिल्या सहकार यज्ञातील चंद्रभान घोगरे पाटील महत्त्वाचा दुवा. आज ज्या जागेत प्रवरा सहकारी साखर कारखाना उभा आहे, ती जागा केवळ चंद्रभान घोगरे पाटील यांच्या शब्दामुळे शेतकºयांनी दिली. त्यानंतर पुढे प्रवरा कारखान्याच्या कामात घोगरे पाटील यांचे योगदान एखाद्या दीपस्तंभासारखेच राहिले. जेथे जेथे जनमाणसांची साथ मिळविण्याची गरज होती, तिथे तिथे घोगरे पाटील पुढे असायचे. समाजाच्या भल्यासाठी अन् उत्कर्षासाठी त्यांनी वेळावेळी ठाम भूमिका घेत जनमतात परिवर्तन घडवून आणले.
चंद्रभान घोगरे पाटील यांनी प्रवरा परिसरात चार दशकाहून अधिक काळ हा समाजकारणासाठी वेचला. त्यांचा राजकीय काळ हा अल्पावधीचा. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या संकल्पनेचे पहिले आद्य प्रवर्तक घोगरे पाटील हेच असावेत, असे म्हणणेही वागगे ठरणार नाही. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, शरद पवार, अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, बाळासाहेब विखे, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, मारुतराव घुले, कॉ. पी. बी. कडू, आबासाहेब निंबाळकर, बाबूराव तनपुरे, यशवंतराव गडाख, भाऊसाहेब थोरात, गोविंदराव आदिक अशा त्याकाळच्या मातब्बर नेत्यांबरोबर काम करत असताना चंद्रभान घोगरे पाटील यांना कधीच सत्तेचा मोह पडला नाही, हे जर आजच्या पिढीला सांगितले तर त्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही.
वयाच्या २० व्या वर्षी १९४३ साली लोणी खुर्द गावची पोलीस पाटीलकी चंद्रभान घोगरे यांना मिळाली. येथूनच त्यांचा समाजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर जिल्हा पार्लमेंट बोर्डाचे सदस्य या नात्याने विकास कामात त्यांनी रस घेतला. श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून शेतक-यांच्या हिताचे निर्णय असोत की कामगार युनियनचे सदस्य म्हणून श्रमजिवी कामगारांच्या हिताबद्दल दक्षता असो घोगरे पाटील यांनी केलेले काम चिरकाल स्मरणात राहणारे आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाची संधीही चंद्रभान घोगरे पाटील यांना १५ वर्ष मिळाली.
प्रवरा सहकारी साखर कारखाना उभारी घेत असताना चंद्रभान घोगरे पाटील शेतकरी, सभासदांच्या हितासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत होते. माझ्या ग्रामीण भागातील मुली-मुले शिकले पाहिजे, समृद्ध झाले पाहिजे या विचाराने घोगरे यांनी १९६४ साली स्थापन झालेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष या नात्याने शिक्षण सर्वसामान्यांच्या दारात नेले. सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करुन दिली. प्रवरा परिसरात आणि विशेषत: लोणी परिसरात प्रवरा पब्लिक स्कूल या इंग्रजी शाळेसाठी, प्रवरा कन्या विद्या मंदिर या मुलींच्या शाळेसाठी आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयासाठी चंद्रभान घोगरे यांच्या शब्दाखातर शेतकºयांनी शेतजमिनी दान दिल्या.
सहकार, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीत अग्रभागी असलेल्या चंद्रभान घोगरे पाटील यांना वयाच्या ३० व्या वर्षी म्हणजे १९५३ साली लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची संधी मिळाली. त्यामुळे त्यांची सामाजिक व राजकीय वाटचाल जोरात सुरु झाली. पण समाजसेवेचे व्रतस्थ असलेल्या चंद्रभान घोेगरे पाटील यांनी राजकारणात फार रस दाखविला नाही. १९७८ ते ८० या अल्प काळातील शिर्डी विधानसभेची आमदारकी वगळता ते राजकारणात रमले नाहीत. मात्र, सहकार क्षेत्रात काम करताना त्यांनी कधी पैसा, सत्ता, प्रसिद्धीची हाव धरली नाही. म्हणूनच चंद्रभान घोगरे  पाटलांसारखा माणूस कधी काळी शरद पवारांनाही आपला आदर्श वाटला.
प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा सहकारी बँक या संस्था स्थापनेपासून त्या सुस्थितीत आणण्यासाठी चंद्रभान घोगरे पाटील यांनी मोठे योगदान दिले. पण त्यांनी कधीही याचा नगारा आपल्या हयातीत वाजविला नाही. उलट चंद्रभान घोगरे पाटील यांनी गोरगरीब जनतेला संकटसमयी स्वत:हून बोलावून घेत मदत केली. स्पष्टवक्तेपणा आणि बाणेदार वृत्तीसाठी ते ओळखले जात.
जेमतेम सातवी शिकलेल्या चंद्रभान घोगरे पाटील यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न, शेती व्यवसायाच्या समस्यांचा नेटका असा सूक्ष्म अभ्यास होता. त्यामुळे या समस्यांची सोडवणूक करण्यात चंद्रभान घोगरे नेहमी अग्रभागी राहिले़ सत्यशोधक समाजाची चळवळ, राजकीय स्वातंत्र्याची चळवळ यामुळे अनेक नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी घोगरे पाटील यांचा संबंध आला. महात्मा ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, डॉ़ कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील अशा अनेक मंडळींच्या विचारांचा पगडा घोगरे पाटील यांच्यावर होता. त्यामुळे त्यांच्या कार्याची दिशाही शेवटपर्यंत तशीच राहिली.  
चंद्रभान घोगरे पाटील डाव्या पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते. पक्षीय राजकारणाबरोबर त्यांनी बहुजन समाजासाठी मोठे काम केले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेमुळे पक्षीय राजकारणात गेलेले घोगरे पाटील फार काळ राजकारणात रमले नाहीत. मात्र, आपल्या अल्प काळात केलेले कामही उल्लेखनीय आहे़ चंद्रभान घोगरे यांनीच (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांना राजकारणात आणले़ त्यांना शक्ती, बुद्धी आणि युक्तीचे मार्गदर्शन केले़ त्यांना साथ दिली. बाळासाहेब विखे यांनीही अनेकदा घोगरे पाटलांचे जाहीर कौतुक केले. शरद पवारांनाही घोगरे पाटलांचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. ‘सत्तेचा मोह नसलेला निष्ठावान’ अशा शब्दात पवारांनी घोगरे यांच्या निष्ठेचा गौरव केला होता.

जन्म : २८ नोव्हेंबर १९२३
मृत्यू : १ जून २००१

भूषविलेली पदे 
- १९४३ :  पोलीस पाटील, लोणी खुर्द 
- १९४९ : सदस्य, प्रवरा सहकारी साखर कारखाना
- १९५०-१९९० : संचालक, प्रवरा सहकारी साखर कारखाना
- १९५२-५३ : सरपंच, लोणी खुर्द 
- १९५५-५६ : सदस्य, रयत शिक्षण संस्था
- १९६० : संचालक, जिल्हा सहकारी बँक 
- १९६० : संचालक, श्रीरामपूर देखरेख संघ व खरेदी विक्री संघ
- १९६० : संचालक, श्रीरामपूर तालुका विकास बोर्ड 
- १९६४ : संस्थापक संचालक, श्रीरामपूर तालुका सूतगिरणी
- १९६४-१९९० : उपाध्यक्ष, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था 
- १९७२ :सदस्य व मुख्य प्रवर्तक, प्रवरा सहकारी बँक
- १९७२-७३ : अध्यक्ष, प्रवरा सहकारी बँक 
- १९७५ : संस्थापक विश्वस्त, प्रवरा मेडिकल ट्रस्ट
- १९७६ : अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखाना 
- १९७६ : अध्यक्ष, प्रवरा सहकारी शेती औजारे उत्पादन कारखाना
- १९७८-८० : इंदिरा काँग्रेस पक्षाचे आमदार, शिर्डी विधानसभा  
              मतदार संघ


गणेश आहेर (‘लोकमत’चे लोणी येथील वार्ताहर)

Web Title: First MLA of Shirdi Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.