अहमदनगर जिल्ह्यात आढळला पहिला ओमायक्रॉ बाधित रुग्ण; नायजेरियातून परतलेली महिला संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:24 PM2021-12-24T19:24:04+5:302021-12-24T19:25:16+5:30
जगभरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर, आता नगर जिल्ह्यात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर : नगर जिल्ह्यात अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. श्रीरामपूरमध्ये पहिला रुग्ण सापडला आहे. बाधित रुग्ण ४१ वर्षीय महिला असून ती नायजेरियातून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
गेल्या काही दिवसांपासून ही महिला व तिचा मुलगा नायजेरिया येथून आले होते. तेव्हाच आरोग्य विभागातर्फे या दोघांचेही नमुने तपासणीसाठी गेण्यात आले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर यातील महिला ओमायक्रॉन बाधित आढळली आहे, तर मुलाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. महिलेवर श्रीरामपूरमधीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जगभरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर, आता नगर जिल्ह्यात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात नगर जिल्हा लसीकरणात बराच मागे असल्याने त्याचाही परिणाम रुग्ण वाढीवर होत आहे.
विशेष म्हणजे श्रीरामपूरमध्ये सर्वात कमी लसीकरण झालेले आहे. पहिला रुग्ण आढळल्याने आता लसीकरणाबाबत गांभीर्य वाढले आहे.