अखेर प्रतिक्षा संपली....अहमदनगर जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:13 PM2021-01-16T12:13:42+5:302021-01-16T12:14:36+5:30
अखेर प्रतिक्षा संपली....कोरोनावरील लस अहमदनगरच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली. जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आठ केंद्रावर शनिवारी सकाळी कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. यावेळी टाळ्या वाजवून आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे स्वागत केले.
अहमदनगर : अखेर प्रतिक्षा संपली....कोरोनावरील लस अहमदनगरच्याआरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली. जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आठ केंद्रावर शनिवारी सकाळी कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. यावेळी टाळ्या वाजवून आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे स्वागत केले. महापालिकेच्या तोफखाना येथील केंद्रावर कोरोना योद्धा असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला पहिली लस देण्यात आली. लस मिळाल्यानंतर कोरोनाचे संकट संपू दे अशी भावना व्यक्त झाली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सकाळी या मोहिमेला प्रारंभ झाला.
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवारी ही मोहिम सुरू झाली. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येत आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे ही मोहिम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात ३१ हजार १९६ आरोग्य कर्मचार्यांची नोंद पोर्टलवर करण्यात आली आहे. त्यात सुरुवातीच्या टप्प्यात या १२ केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोगय कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. जिल्हयासाठी ३९ हजार लशीचे डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवशी १०० जणांना प्रत्येक केंद्रांवर लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठीचा प्रोटोकॉल ठरवून देण्यात आला आहे.
सुरुवातीला पोर्टलवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर त्यांना प्रतीक्षा कक्षात बसवण्यात आले. तेथून प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले. नंतर लस दिलेल्या कर्मचाऱ्यांना अर्धा तास विश्रांती घेण्यासाठी सांगितले गेले.