आधी काम... नंतर निविदा, वखार महामंडळाचा अजब कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 08:39 PM2018-02-25T20:39:32+5:302018-02-26T06:00:00+5:30
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यातील गोदामांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल दहा कोटींची ही कामे निविदा प्रसिद्ध होण्याआधीच पूर्ण झाल्याने यात कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सुदाम देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यातील गोदामांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल दहा कोटींची ही कामे निविदा प्रसिद्ध होण्याआधीच पूर्ण झाल्याने यात कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची राज्यात आठ विभागीय कार्यालये, तर १८७ ठिकाणी ८०० गोदामे आहेत. कृषी उत्पादने, बियाणे,खते, शेती अवजारे, कापूस,औद्योगिक मालाची साठवणूक आणि तेथून वितरण करण्यासाठी गोदामे बांधण्यात आली आहेत. गोदामामध्ये शेतक-यांच्या उत्पादनासाठी जागाही राखून ठेवली जाते. यामुळे मालाची प्रत टिकून राहते. आग, पूर, चोरी अशा धोक्यांपासून संरक्षणासाठी १०० टक्के विमा उतरविला जातो. गोदामाची डागडुजी, दुरुस्ती, रंगरंगोटी करण्याचे कामही दरवर्षीच सुरू असते. उन्हाळा सुरू झाल्याने सध्या गोदामांची दुरुस्ती, नुतनीकरण,रंगरंगोटी,संरक्षक भिंत बांधणे, विद्युत दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील गोदामांची दुरुस्ती, रंगरंगोटी
राज्य वखार महामंडळाची जिल्ह्यात दहा ठिकाणी गोदामे आहेत. वाकोडी रोड, भवानीनगर (नगर), केडगाव, नगर-पुणे रोड (नगर), खडकी, दौंड रोड, कायनेटिक चौक (नगर), नागापूर एमआयडीसी (नगर), मार्केट यार्ड, कोपरगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, नेवासा, शिंगवे तुकाई-घोडेगाव, नेवासा एमआयडीसी, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, संगमनेर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, श्रीरामपूर, वांबोरी (ता. राहुरी). अशी गोदामे आहेत. यापैकी नेवासा एमआयडीसी, संगमनेर, केडगाव, नागापूर येथील गोदामांची दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामे सुरू आहेत.
नागापूर गोदामाच्या रंगरंगोटीेचे काम पूर्ण
‘लोकमत’ने नागापूर एमआयडीसी येथील गोदमाची रविवारी (दि.२५) दुपारी पाहणी केली असता येथील गोदामाच्या रंगरंगोटीची बहुतांश कामे पूर्ण झाली होती. या गोदामाच्या रंगरंगोटीचे २१ लाख ५७ हजार ९८ रुपये खर्चाचे आहे. या कामाची निविदा ३ मार्च रोजी उघडणार आहे. मात्र निविदा उघडण्याआधीच हे काम पूर्ण झाले आहे.