भंगार साहित्यातून साकारले माशाचे शिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:20 AM2021-03-28T04:20:39+5:302021-03-28T04:20:39+5:30
अहमदनगर : भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यानात ऋषिकेश चांदगुडे या युवकाने भंगार साहित्यापासून शिल्प साकारले आहे. व्हेल मासा आणि जहाज ...
अहमदनगर : भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यानात ऋषिकेश चांदगुडे या युवकाने भंगार साहित्यापासून शिल्प साकारले आहे. व्हेल मासा आणि जहाज अशा आकाराची शिल्पकृती लहान मुलांना आकर्षित करून घेत असून, तो सेल्फी पॉईंट ठरला आहे. या शिल्पाचे शुक्रवारी सायंकाळी आमदार संग्राम जगताप आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
महालक्ष्मी उद्यानात जुनी तुटलेली खेळणी, खराब झालेले लोखंडी पोल, सी-सॉ, घसरगुंड्या आदी भंगारातील साहित्याचा उपयोग करून तरुण कलाकार ऋषिकेश चांदगुडे याने हे शिल्प साकारले. व्हेल मासा आणि जहाज यांची एकत्रित रचना त्यामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये फक्त भंगारात मिळालेल्या साहित्याचा वापर केला आहे. आबालवृद्धांना हे शिल्प आकर्षित करत आहे. या शिल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर आमदार-महापौरांनी ऋषिकेशचे कौतुक केले. तो सध्या जे. जे. आर्ट महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आर्ट व बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी त्याच्या कलाकृतीची निवड झाली आहे. हे शिल्प उद्यानात बसविण्यासाठी उद्यान विभागाचे प्रमुख मेहेर लहारे यांनी पुढाकार घेतला. हे शिल्प उद्यानाच्या सौंदर्यात भर घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, संजय ढोणे, विलास ताठे, निखील वारे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक सचिन जाधव, सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
---
फोटो- २७ महालक्ष्मी उद्यान
मासा आणि जहाज यांची एकत्रित कलाकृती असलेले शिल्प नगर येथील महालक्ष्मी उद्यानात बसविण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, सभापती अविनाश घुले यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मेहेर लहारे, कलाकार ऋषिकेश चांदगुडे आदी उपस्थित होते.