नगर महापालिका बांधणार पाचशे घरे; बारा कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:32 PM2018-01-17T15:32:50+5:302018-01-17T15:33:13+5:30
महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात पाचशे घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी रमाई आवास योजनेतून १२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली.
अहमदनगर : महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात पाचशे घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी रमाई आवास योजनेतून १२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली.
अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई योजनेतून घरे बांधण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या योजनेतून पाचशे घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. योजनेतील प्रत्येक घरासाठी अडीच लाख मिळणार असून, त्यासाठी ३० चौ. मी. स्वत:ची जागा आवश्यक आहे. ३० जानेवारीपर्यंत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. यापूर्वी १२१ अर्ज घरांसाठी आले होते. त्यातील ४४ घरांना मंजुरीही मिळाली होती. मात्र अद्याप यातील एकही घर उभे राहिलेले नाही. या घरांसाठी आलेले एक कोटी रुपये पडून आहेत.
आता पुन्हा महापालिकेने रमाई आवास योजनेतून अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकांसाठी घरांची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना बोल्हेगाव, नागापूर, रेल्वे स्टेशन, सिद्धार्थनगर, बालिकाश्रम रोड, माळीवाडा आदी भागात राबविण्यात येणार आहे. या भागात लाभार्थी जास्त संख्येने आहेत, त्यामुळे या भागांवर लक्ष केंद्रीत केल्याचे महापौर कदम यांनी सांगितले.