अवैध वाळूच्या डंपरखाली चिरडून मृत्यू पाच जण जखमी; श्रीरामपूर तालुक्यातील घटना
By शिवाजी पवार | Published: August 17, 2023 12:59 PM2023-08-17T12:59:06+5:302023-08-17T12:59:22+5:30
दुर्घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील शासकीय वाळू डेपोजवळून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एका डंपरखाली चिरडून एक जण जागीच ठार झाला. दुर्घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मयताचे नाव शफीक अहमद पठाण ( वय ४५, रा.उक्कलगाव ता.श्रीरामपूर ) असे आहे. राज्यातील पहिल्या शासकीय वाळू डेपोचे काही महिन्यापूर्वीच उद्घाटन करण्यात आले होते. मात्र तरीही श्रीरामपूर तालुक्यातील वाळू तस्करीला लगाम घालण्यात महसूल प्रशासनाला यश आले नाही.
शासकीय डेपोजवळून अवैध वाळू उपसा सुरू आहे. येथे वाळूचे काही केंद्र तस्करांनी तयार केले आहेत. गुरुवारी पहाटे येथून वाळू उपसा करून खैरीनिमगाव गोंडेगाव रस्त्याने अतिजलद गतीने जाणाऱ्या डंपरचे टायर फुटून ते उलटले. त्यात वाळूच्या ढिगाऱ्याखाली एकाचा दबून मजूर पठाण यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या सोबत असणाऱ्या वाळू भरणाऱ्या पाच मजुरांना गंभीर दुखापत झाली. सर्वजण उक्कलगाव येथील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले. पोलिसांनी डंपर जप्त केला आहे.