श्रीगोंद्यात पाच दुकाने फोडली; चोरटे सीसीटिव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 05:22 PM2019-10-23T17:22:47+5:302019-10-23T17:23:41+5:30
श्रीगोंदा शहरातील झेंडा चौकातील अजय जीन्स गॅलरी, कटारिया कलेक्शन, गायत्री मोबाईल शॉपी, आनंद मेडिकल या पाच दुकानात मंगळवारी रात्री चोरी झाली.
श्रीगोंदा : शहरातील झेंडा चौकातील अजय जीन्स गॅलरी, कटारिया कलेक्शन, गायत्री मोबाईल शॉपी, आनंद मेडिकल या पाच दुकानात मंगळवारी रात्री चोरी झाली.
यामध्ये ४३ हजार ३०० रूपयांचे वेगवेगळे साहित्य, रक्कम चोरीस गेली. नागवडे पब्लिक स्कूलमध्ये ही लॅपटॉप, साउंड सिस्टीम चोरीस गेली. या प्रकरणी प्रतीक भाऊसाहेब घाटे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला. शहरातील झेंडा चौक परिसर ही मोठी बाजारपेठ आहे. येथे मोबाईल, ज्वेलरी, मिठाई, कपड्यांची मोठमोठी दुकाने आहेत. मंगळवारी मध्यरात्री येथील पाच दुकानांमध्ये चोरी झाली. बुरूड गल्ली येथील सागर देशपांडे यांनी प्रतीक घाटे यांना दुकानाची कडी, शटर तुटली असल्याचे सांगितले. त्यानंतर येथील दुकानांमध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अजय जीन्स गॅलरीमधून २९ हजार ६०० रूपयांचे कपडे, कटारिया कलेक्शन या आनंद कटारिया यांच्या दुकानातून ९ हजार ५०० रूपयांचे कपडे, स्वप्नील चव्हाण यांच्या गायत्री मोबाईलमधून ४ हजाराची रोकड, साहेबराव खेतमाळीस यांच्या आनंद मेडिकल शॉपमधून ५०० रूपयांची रोकड असे एकूण ४३ हजार ३०० रूपये रोकड व साहित्य चोरीस गेले आहे. त्यानंतर नागवडे पब्लिक स्कूलच्या आॅफीसचे कुलूप तोडून एक लॅपटॉप व साऊंड सिस्टीम चोरून नेली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली. काही धागेदोरे मिळावेत यासाठी आलेले श्वानपथकही गावातच घुटमळले. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ते २० ते २२ वयोगटातील असून त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे ओळखू येत नाही.