जिल्ह्यात पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्ट मोबाइल; संपानंतर शासनाचा निर्णय

By चंद्रकांत शेळके | Published: February 13, 2024 04:09 PM2024-02-13T16:09:44+5:302024-02-13T16:10:01+5:30

विविध अहवाल पाठवण्यात येणार वेग; रेकाॅर्ड ठेवणेही सोपे

Five thousand Anganwadi workers in the district will get smart mobiles; Government's decision after the strike | जिल्ह्यात पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्ट मोबाइल; संपानंतर शासनाचा निर्णय

जिल्ह्यात पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्ट मोबाइल; संपानंतर शासनाचा निर्णय

अहमदनगर : राज्यात ५३ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या संपावर तोडगा निघाला आहे. याशिवाय तांत्रिक कामासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाइल देण्याची मागणीही शासनाने मान्य केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार १८१ अंगणवाडी सेविकांना हे मोबाइल मिळणार आहेत.

एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावात अंगणवाड्यांचे कामकाज चालते. मोठ्या अंगणवाड्यांच्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत, तर मिनी अंगणवाडीत सेविका हे एकच पद आहे. अंगणवाडीत सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना शिकवले जाते, तसेच सेविकांकडून शासकीय अनेक कामे केली जातात. यासाठी सेविकांना शासनाने मोबाइल दिला होता. यावर माहिती भरली जाते. बालकाचे वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, उपस्थिती आदी प्रकारची माहिती भरण्यात येते; पण अनेक वर्षे वापरात असल्याने जुना मोबाइल वापराला अडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाने आता स्मार्ट मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे मोबाइल अंगणवाडी सेविकांना मिळणार आहेत.

अंगणवाडी सेविकांना अनेक कामे
अंगणवाडी सेविकांना मुलांना शिकवणे, पोषण आहार, गर्भवती माता, बालकाचे वजन घेणे, लसीकरण आदी कामे करावी लागतात, तसेच शासनाच्या आदेशानंतर सर्वेक्षणाचीही जबाबदार असते. यामुळे सेविकांवर सतत कामाचा ताण असतो.
यामुळे अंगणवाडी संघटनांच्या वतीने वारंवार आंदोलने होत असतात.

अहवाल देणे होईल सोपे
अंगणवाडी सेविकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्मार्ट मोबाइलमध्ये अनेक ॲप समाविष्ट करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना काम करणे सोपे होणार आहे. कारण अंगणवाडी सेविकांना केलेल्या कामाचा अहवाल द्यावा लागतो. नवीन मोबाइल सेविकांसाठी फायदेशीर ठरतील, असे सांगण्यात येत आहे.

शहरी अन् ग्रामीण सेविकांनाही लाभ...
जिल्ह्यात शहरासह प्रत्येक गावांत अंगणवाड्या कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यात लहान-मोठ्या मिळून ५ हजार ३७५
अंगणवाड्या असून त्यात ४ हजार ३९७ अंगणवाडी सेविका, तर ७८४ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण ५ हजार १८१ सेविका कार्यरत आहेत.

जुने मोबाइल खराब झाले होते. अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी नुकताच संप केला, तसेच न्यायालयातही दाद मागावी लागली. त्यानंतर आता नवीन मोबाइल देण्याचे शासनाने मान्य केले आहे. त्याचे वितरण तातडीने व्हावे.
- जीवन सुरडे, जिल्हा सरचिटणीस, अंगणवाडी युनियन

Web Title: Five thousand Anganwadi workers in the district will get smart mobiles; Government's decision after the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.