कर्जत तालुक्यातून आक्रोश मोर्चासाठी पाच हजार कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 07:08 PM2018-03-20T19:08:42+5:302018-03-20T19:10:12+5:30
अहमदनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असा निर्धार कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
कर्जत : अहमदनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असा निर्धार कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मोर्चाचे नियोजन करण्यात आले. राज्य सरकार सध्या सर्वच ठिकाणी अपयशी ठरले आहे. यामुळे जनतेच्या मनात या सरकारविषयी मोठा रोष व्यक्त केला जात आहे म्हणून अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २८ मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक कर्जत येथे मंगळवारी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर सडकून टीका करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय लोळगे, कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य शाम कानगुडे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी शहाजीराजे भोसले, फिरोज पठाण, उमर खान, स्वप्नील तनपुरे, सचिन लाळगे, वैभव काळे, विशाल शेटे, निलेश गांगरडे. विकास राऊत, सचिन मांडगे उपस्थित होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत-जामखेडचे नेतृत्व करावे, अशी मागणी यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.