गोदावरीतून जायकवाडीला गेले पाच टीएमसी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:02+5:302021-08-24T04:26:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : यंदा नाशिक धरण समूहात पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच कमी राहिले. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमीच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : यंदा नाशिक धरण समूहात पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच कमी राहिले. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमीच राहिल्याने गोदावरी नदीतून पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत जायकवाडी धरणात २३ ऑगस्ट अखेर ५ टीएमसी पाणी गेले आहे. याउलट गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये सुमारे १९ टीएमसी जायकवाडीला गेले होते. प्राप्त परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून टळलेले समन्यायी पाणी वाटपाचे संकट पुन्हा डोके वर काढून नगर जिल्ह्यातील कालव्यांच्या आवर्तनांना कात्री तर बसणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.
यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून सर्वत्र कमी पाऊस राहिला. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील धरण समूहात देखील जाणवला. त्यामुळे नांदूर मद्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीत कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरीतून जायकवाडी धरणात आत्तापर्यंत पाच टीएमसी पाणी वाहून गेले आहे. दोन वर्षापासून पर्जन्यमान चांगले राहिल्याने जायकवाडीला मुबलक पाणी जात होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमीच राहिल्याने पुन्हा नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष पेटतो की काय? अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच तालुक्यात पुन्हा एकदा उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढले आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातही पाऊस कमीच आहे. विहरी, कूपनलिका यांची पाणी पातळी खालावली आहे.
..................
समन्यायी कायद्यामुळे कायमच संघर्ष !
२००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मागील काही वर्ष दुष्काळ राहिल्याने नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा असा नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यावरून कायम संघर्ष पेटत राहिला. प्रसंगी या संघर्षातून तीनही जिल्ह्यातील नेत्यांची, शेतकऱ्यांची अनेक आंदोलने झाली. न्यायालयीन लढाया देखील झाल्या. मात्र, कायदाच समन्यायी असल्याने या लढाईत मराठवाड्याकडे कायम विजयश्री राहिली. या समन्यायीच्या लढाईत नाशिक - नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पाणी जायकवाडीला जात होते. तसतसे कालव्यांचे आवर्तन कमी होत होते. कमी झालेल्या आवर्तनामुळे या लाभक्षेत्रातील शेती उद्ध्वस्त होऊ लागली.
.............
जायकवाडीत ४१ टक्के पाणी
जायकवाडी धरण १५ ऑक्टोबर अखेर ६५ टक्के भरलेले असल्यास समन्यायी पाणी वाटपाचा तिढा सुटलेला असतो. यंदा मात्र, पाऊस कमी असल्याने धरण ४१ टक्केच भरलेले आहे. त्यामुळे १५ तारखेपर्यंत धरण ६५ टक्के भरले नाहीच तर समन्यायीचे भूत वर डोके काढू शकते.
.........
२३ ऑगस्ट अखेर धरण व टक्केवारी
दारणा : ८८.८२
गंगापूर : ९०.१२
कडवा : ९०.५२
भोजापूर : २०.७८
वालदेवी : १००
मुकणे : ५८.१७
कश्यपी :६२.५३
गौतमी-गोदावरी : ७१.७९
आळंदी : १००
भाहुली : १००
वाकी : ५१.२८