पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे: काँग्रेसने मनपात भरवली प्रती महासभा
By अरुण वाघमोडे | Published: December 20, 2023 07:05 PM2023-12-20T19:05:03+5:302023-12-20T19:05:18+5:30
‘पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे’, अशी घोषणाबाजी याप्रसंगी करण्यात आली.
अहमदनगर: महापालिकेत बुधवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपात प्रतिमहासभा घेत प्रशासनाच्या कारभाराविरोधात आवाज उठविला. ‘पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे’, अशी घोषणाबाजी याप्रसंगी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. याप्रसंगी काळे यांच्यासह दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, गणेश आपरे, अलतमश जरीवाला, सुनीता भाकरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, विकास भिंगारदिवे, सुनील क्षेत्रे, गणेश चव्हाण, रियाज सय्यद, सुजित क्षेत्रे, सोफियान रंगरेज, विनोद दिवटे, गौरव घोरपडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील सुमारे ४० हजार दुकानदार, व्यापारी यांच्याशी निगडित असणाऱ्या व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा विषय महासभेच्या अजेंड्यावरवर चर्चेसाठीही नमूद करण्यात न आल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. स्मशानभूमी जमीन घोटाळा, पथदिवे घोटाळा, भूखंड वाटप घोटाळा, रस्ते घोटाळा, श्वान निर्बीजीकरण घोटाळा आदी मुद्दे उपस्थित करत निषेध व्यक्त करण्यात आला. काळे म्हणाले, या पाच वर्षात पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी, भाजपच्या अभद्र युतीची सत्ता होती. याच काळात सर्वाधिक घोटाळे महानगरपालिकेत घडले. त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये सत्तेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातामध्ये होता. त्यामुळे संपूर्ण पाच वर्षांच्या कालखंडामध्ये नगर शहर रस्ते, पिण्याचे पाणी, पथदिवे, गटारी यासारख्या मूलभूत सोयी सुविधांच्या अभावा मुळे त्रस्त झाले आहेत. असे ते म्हणाले.