कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला करणा-या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 07:16 PM2018-03-28T19:16:11+5:302018-03-29T04:51:50+5:30
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार दोषींना बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली.
अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार दोषींना बुधवारी अहमदनगर जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा निकाल दिला.
अमोल सुखदेव खुणे (वय २५ रुई धानोरा, ता. गेवराई, जि. बीड), बाबूराव वामन वाळेकर (वय ३० रा. अंकुशनगर ता. आंबड, जि. जालना), गणेश परमेश्वर खुणे (वय २८ रा. रुई धानोरा, ता. गेवराई, जि. बीड) व राजेंद्र बाळासाहेब जराड पाटील (वय २१ रा. परांडा, ता. आंबड, जि. बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे असून ते चार जण शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आहेत. या चौघांनी १ एप्रिल २०१७ रोजी कोपर्डी खटल्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांच्यावर जिल्हा न्यायालयाच्या आवारात सत्तुराने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा हल्ला थांबविला होता. यावेळी हल्ला करणा-या आरोपींशी झालेल्या झटापटीत कॉन्स्टेबल रवींद्र टकले हे जखमी झाले होते. या घटनेनंतर सहायक फौजदार विक्रम भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सहायक पोलीस कैलास देशमाने यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर हा खटला चालला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. न्यायालयात आरोपीविरोधात युक्ति वाद करताना दिवाणे यांनी सांगितले होते की, चारही आरोपींचा उद्देश हा कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला करण्याचाच होता. या आरोपींनी कोपर्डीतील आरोपींना मारण्याचे कटकारस्थान रचले होते. पोलीस कर्मचा-यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने घटना टळली होती. असे मुद्दे दिवाणे यांनी मांडले होते़ या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास न्यायालयाने निकाल दिला. आरोपीच्या वतीने अॅड. वाजिद खान व अॅड. गणेश म्हस्के यांनी खटला लढविला. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चारही अरोपींना शिक्षा ठोठावली.
असे आहे शिक्षेचे स्वरूप
हल्ला करणा-या चारही आरोपींना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे (३०७) कट रचणे (१२० ब), सरकारी कामात अडथळा (३५४) आर्म अॅक्ट या कलमांतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी १० हजार दंड, दंड भरल्यास ६ महिने कैद, २ वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी २ हजार दंड, दंड न भरल्यास १ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. कोपर्डीच्या आरोपींवर चौघांनी केलेला हल्ला न्यायालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. सरकारी पक्षाने हे सीसीटिव्ही फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले़ न्यायालयात आरोपींविरोधात हा पुरावा महत्त्वाचा ठरला.