भीषण अपघातात पाच युवकांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:32 AM2021-02-23T04:32:07+5:302021-02-23T04:32:07+5:30
नेवासा (जि. अहमदनगर) : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटाजवळ स्वीप्ट कार व ट्रॅव्हल्स यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ...
नेवासा (जि. अहमदनगर) : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटाजवळ स्वीप्ट कार व ट्रॅव्हल्स यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. शंतनू काकडे, कैलास नेवरे, रमेश घुगे, विष्णू चव्हाण, नारायण वरकड अशी मयतांची नावे असून, हे सर्वजण मंठा (जि. जालना) तालुक्यातील रहिवासी होत.
सोमवारी (दि. २२) रात्री दोनच्या सुमारास देवगड फाट्याजवळ अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेली स्विफ्ट कार (क्र. एम.एच. २१, बीएफ ७१७८) महामार्गावरील दुभाजक तोडून औरंगाबादकडून नगरच्या दिशेने येत असलेल्या ट्रॅव्हल बसला (क्र. एम.एच. १९, वाय ७१२३) समोरून धडकली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील शंतनू नायबराव काकडे (वय ३८, रा. जयपूर, ता. मंठा, जि. जालना), कैलास विठ्ठल नेवरे (वय ३७, रा. मेसखेडा, ता. मंठा, जि. जालना), रमेश दशरथ घुगे (वय ३४, रा. मेसखेडा, ता. मंठा, जि. जालना), विष्णू उध्दवराव चव्हाण (वय ३३, रा. मेसखेडा, ता.मंठा, जि. जालना), नारायण दिगंबर वरकड (वय २४, रा. तळतोंडी, ता. मंठा, जि. जालना) हे पाच जण जागीच ठार झाले आहे.
अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक अशोक नागरगोजे, पोलीस नाईक बबन तमनर, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिकांच्या मदतीने जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. परंतु पाचही जण उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
.................आता आम्ही कसं जगायचं
पती गेले. आता पतीनंतर घरचा कर्ता मुलगाही गेला. आम्ही कसं जगायचं असे म्हणत शंतनु काकडे या युवकाची आई कौशल्या काकडे व पत्नी अंजुबाई यांनी घटना समजताच हंबरडा फोडला.
..............
ते नेमकं कोठे गेले होते
दरम्यान हे पाचही मित्र मंठा तालुक्यातील एका मित्राच्या लग्नासाठी वडाळा (ता. नेवासा) येथे आले असल्याचे काहीजण सांगतात तर काहीजण हे पाचही मित्र शिर्डीला गेले होते असे सांगत आहेत. पोलिसांनाही असेच सांगितले जात आहे. त्यामुळे हे मित्र नक्की कोठे व कशासाठी गेले होते, याची नेमकी माहिती मिळू शकली नाही.
............
कसा घडला अपघात
औरंगाबाकडून अहमदनगरच्या दिशेने येत असलेली ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने येत होती. मात्र, दुभाजक फोडून कार विरुद्ध बाजूला येत असल्याचे पाहून ट्रॅव्हल्स चालकाने करकच्चून ब्रेक दाबला. रस्त्यावर सुमारे ५० मीटरपर्यंत टायर घासल्याचे निशाण आहेत. तर त्याचवेळी कारही भरधाव वेगाने होती. या कारचा टायर फुटला असावा. किंवा रस्त्यात काहीतरी अचानक आडवे आले असावे. त्यामुळे चालकाने जोरात ब्रेक दाबला असावा. किंवा कारचा टायर फुटल्यामुळे ही कार दुभाजक ओलांडून पलिकडे गेली असावी. व हा अपघात झाला असावा, अशी शक्यता रस्त्यावर पडलेल्या निशाणींवरुन पोलीस वर्तवित आहेत.