साई नगरात पेटली राष्ट्रभक्तीची ज्योत, साईनगरीतील पहिला प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:33 AM2018-01-27T04:33:55+5:302018-01-27T04:33:58+5:30
केवळ धार्मिकतेचा प्रचार प्रसार न करता साईभक्तांच्या ह्वदयात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचे कार्यही संस्थानच्या माध्यमातुन करण्यात येते असे़ पहिल्या प्रजासत्ताक दिनी साईसंस्थानने गावातून रथ मिरवणूक काढून
प्रमोद आहेर
शिर्डी (अहमदनगर): केवळ धार्मिकतेचा प्रचार प्रसार न करता साईभक्तांच्या ह्वदयात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचे कार्यही संस्थानच्या माध्यमातुन करण्यात येते असे़ पहिल्या प्रजासत्ताक दिनी साईसंस्थानने गावातून रथ मिरवणूक काढून व कर्मचा-यांना भोजन देऊन आनंद साजरा केला होता़
२६ जानेवारी १९५०, गुरूवार रोजी पहिल्या प्रजासत्ताक दिनाला शिर्डीत समाधी मंदीराजवळ ध्वजारोहन समारंभ करण्यात आला़ या आनंदप्रित्यर्थ संस्थानच्या सर्व नोकरांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ पहिल्या प्रजासत्ताक दिनापर्यंत शिर्डीत वीज आली नव्हती त्यामुळे तेलाचे दिवे लावून रोषणाई करण्यात आली़
विशेष म्हणजे अती विशिष्ठ सणांना व दिवशीच बाबांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात येते़ मात्र या परंपरा बाजुला ठेवत प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक क्षणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पहिल्या प्रजासत्ताक दिनी गावातून बाबांच्या प्रतिमेची रथातुन मिरवणुक काढण्यात आली होती़ रात्री कोपरगावचे गजानन विश्वनाथ जोशी व कोपरगावकर भजनमंडळींचे संगीत भजन झाले़ पंडीत जगन्नाथबुवा सुरतकर, व्यासबुवा वेशीकर, सोलापुरचे रामकृष्णबुवा सोमण, दिगंबरबुवा, माधवराव खलेकर, रामदास नायडु वगैरे सोलापुरच्या भाविकांनी गायन, वादन, फिडल, तबला, हार्मोनियमची तर दामुबाण्णा बेलापुरकर यांनी सनईवादन करून समाधी समोर हजेरी दिली़
शिर्डीत वीज पोहचण्यापुर्वी संस्थानने वीज निर्मितीसाठी लेंडीबागेजवळ डिझेल इंजिनावर चालणारे पॉवर हाऊस निर्माण केले़ यामुळे गणेश चतुर्थी ५ सप्टेंबर १९५१ च्या आसपास शिर्डीत पहिला दिवा लागला़ यानंतर उत्सवाबरोबरच राष्ट्रीय सणांच्या दिवशी मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात येई़
१९६१ च्या प्रजासत्ताक दिनी सकाळी कळसानजीक गच्चीवर ध्वजारोहण करण्यात आले़ या निमीत्ताने समाधी व मंदीरावर वीजेच्या रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली़ या दिवशी ग्वाल्हेरचे महाराजांच्या देणगीतुन संस्थान नोकर, गावातील पुढारी, शिक्षक यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले़ रात्री दोन वाजेपर्यंत विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरे करण्यात आले़
पहिले ध्वजारोहन मंदीरालगत झाले असले तरी नंतर मात्र समाधी मंदीरावर ध्वजारोहन सोहळा होत असे़ त्यावेळी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात येई़ त्यानंतर १९८२ च्या आसपास हा कार्यक्रम लेंडीबागेत, जुन्या साईनिवास इमारती समोर होवु लागला़ जागा अपुरी पडु लागल्यानंतर १९९९ पासुन ध्वजारोहन नवीन भक्त निवास, पाचशे रूमच्या मागे, कार्यकारी अधिकारी बंगल्याच्या समोरील मैदानावर होवु लागला़