सुप्यातील फुलांच्या हारांची दुकाने, दूध डेअरी व्यावसायिकांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:06+5:302021-05-05T04:34:06+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील फुलांच्या हारांची दुकाने व दूध डेअरी व्यावसायिकांना सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तास ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील फुलांच्या हारांची दुकाने व दूध डेअरी व्यावसायिकांना सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तास दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना लॉकडाऊन काळात दिलासा मिळाला आहे.
सुपा गाव फुलांच्या हारांसाठी प्रसिद्ध आहे. लॉकडाऊन काळात ही दुकाने बंद होती. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय करणारे, दूध उत्पादक शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांकडून दूध घेऊन ते पॅकिंग करून ग्राहकाला वितरित केले जाते. त्यात एमआयडीसी, नोकरदार, कामगार, व्यावसायिक, सरकारी कर्मचारी, कामगार, उद्योजक व सर्वसामान्य नागरिक असा दूध ग्राहकांचा मोठा वर्ग आहे. मध्यंतरी दूध डेअरी बंद असल्याने दूध ग्राहकांचीही अडचण होत होती. आता त्यांची अडचण थांबणार आहे. त्यासाठी दुकानदारांना घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक आहे. आगामी लॉकडाऊन काळात सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी तीन तासांसाठी ही दुकाने सुरू ठेवण्याची मुभा त्यांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
फुलांच्या हाराचा व्यवसाय करणारे व हार तयार करणारे कारागीर अशी किती तरी कुटुंबे या फुलहार व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांची दुकाने बंद केल्याने व्यावसायिक, कारागीर व त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले होते.