घरासमोरच फुलविला मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:32+5:302021-02-16T04:21:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता जैविक पद्धतीने सर्व प्रकारच्या भाजीपाल्याबरोबरच फुलझाडांचा मळा शेतात ...

Flowering field in front of the house | घरासमोरच फुलविला मळा

घरासमोरच फुलविला मळा

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता जैविक पद्धतीने सर्व प्रकारच्या भाजीपाल्याबरोबरच फुलझाडांचा मळा शेतात नव्हे तर संगमनेर शहरात घरासमोर फुलला आहे. गेल्या ३६ वर्षापासून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व त्यांच्या पत्नी स्वागत शिंदे यांच्या एकत्रित प्रयत्नांनी घरासमोर चार ते पाच गुंठ्यात परसबाग फुलली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शिंदे दाम्पत्याने ३६ वर्षांपूर्वी हाती घेतलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. स्वागत शिंदे यांचे माहेर पुण्याचे. त्यांच्या आईंना बागकामाची विशेष आवड. आईला मदत म्हणून कुंड्यांमधील झाडांना पाणी घालताना, रोपांची, झाडांची निगा राखताना स्वागत शिंदे यांनाही बागकामाची आवड निर्माण झाली. अनिल शिंदे शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित असूनही त्यांनी शेतीची आवड कायमच जपली आहे. त्यांच्यासोबत स्वागत यांचा विवाह झाला. या दोघांमध्येही बागकामाच्या आवडीचा सारखाच गुण. सहकारात महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अनिल शिंदे यांच्याबरोबरच स्वागत शिंदे यांनी ३६ वर्षांपूर्वी घरासमोर बाग फुलविण्याचा विचार केला.

केरळमधून आणलेले श्रीफळाचे झाड लावत परसबाग फुलविण्याचा श्रीगणेशा केला. फळझाडांची रोपे लावण्यात आली. या रोपांना पाणी घालणे, त्यांची निगा राखणे. हे करत असताना हळूहळू बाग फुलत गेली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम करताना अनिल शिंदे यांनी कधीही बागकामाकडे दुर्लक्ष केले नाही. रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेल्या भाजीपाल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड त्यांनी केली. सेंद्रिय खतांचा वापर करून परसबागेत भाजीपाला पिकविला जातो आहे. खत म्हणून ओल्या व सुक्या कचऱ्यांचा वापर केला जातो. परसबागेत पिकविलेल्या भाज्यांची चव वेगळीच लागते. अनेक प्रकारच्या फुलझाडांनी ही परसबाग बहरली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी या परसबागेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

....

..या प्रकारची झाडे फुलविली

भाजीपाल्याबरोबरच नारळ, आंबा, पेरू, अंजीर, केळी, सीताफळ, रामफळ, जांभूळ, लिंबू, आवळा यांच्यासह अनेक प्रकारच्या फळझाडे फुलविली आहेत. याशिवाय कापूर तुळस, लेंडी पिंपळी, हळद, ओवा, दालचिनी, वेलदोडे, गवती चहा, कडीपत्ता, गुंजपाला, आळूची, विड्याची पाने आदी वनस्पतीही फुलली आहे.

...

बागकामाची आईची आवड जपली आहे. दररोज ताजा भाजीपाला, फळे उपलब्ध होतात. मात्र, यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतात. प्रत्येक झाडाची निगा राखावी लागते. यात एक वेगळाच आनंद मनाला मिळतो.

-स्वागत अनिल शिंदे, गृहिणी, संगमनेर

Web Title: Flowering field in front of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.