छावणी परिषदांसाठी दिल्लीत पाठपुरावा करू
By Admin | Published: July 26, 2016 11:50 PM2016-07-26T23:50:17+5:302016-07-26T23:50:17+5:30
\भिंगार : देशातील ६२ छावणी परिषदांमध्ये अनेक समस्या असून, या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही़ या परिषदांमधील समस्या मार्गी लावण्यासाठी
\भिंगार : देशातील ६२ छावणी परिषदांमध्ये अनेक समस्या असून, या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही़ या परिषदांमधील समस्या मार्गी लावण्यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा करणार आहे़ मागण्यांची दखल घेतली नाही तर परिषदा बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे अखिल भारतीय छावणी परिषदेचे उपाध्यक्ष व सदस्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीवकुमार गुप्ता यांनी सांगितले़
गुप्ता यांनी मंगळवारी छावणी परिषदेला भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सदस्यांशी चर्चा केली़ यावेळी त्यांनी प्रश्न समजावून घेत दिल्ली दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच परिषदेच्या दुय्यम अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यांसंदर्भात संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता, त्यास यश आले असून बदल्यांचा अध्यादेश लवकरच निघणार आहे, असे त्यांनी सांगितले़
‘स्मार्ट सिटी’सारख्या योजना देशात राबवल्या जात आहेत. सर्व शहरे झपाट्याने विकसित होत आहेत़ देशातील बहुतांश छावणी परिषदा मात्र, विकासकामांत मागे आहेत. ब्रिटिशांनी अंमलात आणलेल्या कायद्याच्या धर्तीवर छावण्यांचा कारभार सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाच्या योजनांचा लाभ येथे मिळत नाही़ मूलभूत सुविधांअभावी अहमदनगरसारख्या छावणी परिषदा विकासात मागे राहिल्या आहेत.
छावणी परिषद कायद्यात बदल होणार नसतील तर उपाध्यक्ष व सदस्यांचे देशपातळीवर अधिवेशन बोलावून सर्व छावणी परिषदा बरखास्त कराव्यात, अशी मागणी करण्यात येईल, असे सांगत गुप्ता म्हणाले, छावणी परिषदेचा उपाध्यक्ष हा जनतेतून निवडावा, ही मागणी आम्ही उचलून धरली आहे. त्यामुळे कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींना संधी मिळेल.
यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष मुसाद्दिक सय्यद, रवी लालबोंद्रे, बाळासाहेब पतके, सदस्या शुभांगी साठे, गणेश साठे व सुरेश मेहतानी आदी उपस्थित होते़
(वार्ताहर)