श्रीगोंद्यातील प्रलंबित कामांचा पाठपुरावा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:16 AM2021-01-10T04:16:00+5:302021-01-10T04:16:00+5:30
श्रीगोंदा : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी श्रीगोंदा तहसील, नगरपालिकेच्या अधिकारी-पदाधिकारी यांची बैठक घेतली आणि तालुका व शहरातील प्रलंबित समस्यांचा ...
श्रीगोंदा : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी श्रीगोंदा तहसील, नगरपालिकेच्या अधिकारी-पदाधिकारी यांची बैठक घेतली आणि तालुका व शहरातील प्रलंबित समस्यांचा आढावा घेतला. लेंडी कचरा डेपो, अभ्यासिका यासह कामांची पाहणी केली. प्रलंबित कामांबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश दिले.
सुरुवातीला तहसील कार्यालयात कोरोना मोहीम, अतिवृष्टी, पूरग्रस्त, अनुदान व ग्रामपंचायत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. कौठा ग्रामपंचायत निवडणूक चिन्ह बदलबाबत शाहूराजे शिपलकर यांच्या तक्रारींबाबत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार चिन्ह बदलले. यावर आपणास न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे.
तहसीलदार प्रदीप पवार, अपर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, सायली नांदे, तालुका गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले उपस्थित होते.
लेंडी नाला सुशोभीकरण करण्याच्या कामाला जागेच्या वादामुळे न्यायालयात स्थगिती आहे. यावर कायदेशीर मार्ग काढताना संत शेख महंमद देवस्थानची जागा ताब्यात घेऊ नये, असे सूचित केले.
भिंगाण रस्त्यावरील कचरा डेपोला बांबूच्या झाडांचे कंपाऊंड करावे. शेतकऱ्यांच्या शेतात कचरा जाणार नाही याची दक्षता घ्यावी, याकडे नानासाहेब शिंदे यांनी लक्ष वेधले.
अभ्यासिका व क्रीडा संकुल परिसरात असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढावीत. त्यापुढे या कुटुंबाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करावे.
नगरपालिकेमध्ये जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. भाजपचे शहराध्यक्ष दीपक शिंदे यांनी शिक्षक काॅलनीतील भुयारी गटार, रस्ते याकडे लक्ष वेधले. भोसले यांनी पालिकेने कामाचा पाठपुरावा करावा, जिल्हा प्रशासन मदत करेल, असे सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, गटनेते मनोहर पोटे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, प्रशांत गोरे, सतीश मखरे, टिळक भोस, सतीश बोरुडे, गणेश भोस, निसार बेपारी, राजेश लोखंडे, समीर बोरा आदी उपस्थित होते.
फोटो ०९ श्रीगोंदा कलेक्टर
श्रीगोंदा येथील अभ्यासिका व क्रीडा संकुल परिसराची पाहणी करताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, नगराध्यक्षा शुभांगी पोटे व इतर.