लॉकडाऊन टाळायचे तर उपाययोजनांचे पालन करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:58 AM2021-02-20T04:58:28+5:302021-02-20T04:58:28+5:30
कोरोना परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रदीर्घ आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...
कोरोना परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रदीर्घ आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने आदी उपस्थित होते. या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. जारी करण्यात आलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूल, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना देण्यात आले. भोसले म्हणाले, राज्यात विदर्भातील अमरावती, वर्धा तसेच पुणे,मुंबई परिसरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता साशंकता निर्माण होणे सहाजिक आहे. याचे भान बाळगून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांत मास्क वापराविषयी गांभीर्य नसल्याचे जाणवते आहे. तसेच लग्न व इतर कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
-----------------------------------------------------------
लग्नात गर्दी केली तर कारवाई
लग्न सोहळ्यात गर्दी होत असल्याने प्रशासनाने मंगल कार्यालय संचालकाची बैठक घेत निर्देश दिले आहेत. निश्चित प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळली तर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या प्रशासनास कारवाई संबंधीचे आदेश जारी केले आहेत. मर्यादेपेक्षा लग्न समारंभात जास्त गर्दी आढळली तर कार्यालयाचा परवाना रद्द करीत दंडात्मक कारवाई देखील केली जाईल.प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांनी देखील परिस्थितीचे भान बाळगून मास्कचा वापर करावा, अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच कारवाईची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हावासीयांना केले आहे.