बेघरांसाठी अन्नसेवा एक्स्प्रेस बनली आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:27+5:302021-05-24T04:20:27+5:30

अहमदनगर : नगर शहराच्या विविध भागात बेघर, गरजू आढळतात. मात्र, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांच्या जेवणाची ...

The food service express became the basis for the homeless | बेघरांसाठी अन्नसेवा एक्स्प्रेस बनली आधार

बेघरांसाठी अन्नसेवा एक्स्प्रेस बनली आधार

अहमदनगर : नगर शहराच्या विविध भागात बेघर, गरजू आढळतात. मात्र, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था कुठेच होत नाही. अशांसाठी नागरदेवळे येथील इंद्रप्रस्थ कॉलनीमधील तरुण आणि महिलांनी पुढाकार घेतला आहे. दिवसभर स्वयंपाक बनवून ते या बेघर गरजूंसाठी वाटप करतात. गेल्या महिनाभरापासून त्यांची ही अन्नसेवा एक्स्प्रेस बेघर, गरजूंसाठी आधार बनली आहे.

लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद आहेत. त्यामुळे बेघर, मजुरांचे पोट कसे भरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरदेवळे येथील इंद्रप्रस्थ कॉलनीमधील कुटुंबीयांनी यासाठी पुढाकार घेऊन बेघरांना डबा पोहोच करण्याची व्यवस्था केली आहे. मोटारसायकलवरून येथील तरुण शहरातील विविध भागातील बेघरांपर्यंत जेवणाचे डबे पोहोचवत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे बेघर, मनोविकलांग, भिक्षेकरी आदींचा उदरनिर्वाह कसा चालणार याची यात मोठी चिंता आहे. नगर शहरात विविध संघटनांनी अशा बेघरांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरदेवळे येथील शुभम भालदंड, प्रवीण वाघमारे यांनी मागील वर्षी लॉकडाऊन कालावधीत अन्नसेवा एक्स्प्रेस चालवली होती. आता पुन्हा एकदा नगर शहर व परिसरातील बेघरांना पोटभर जेवण मिळावे यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी इंद्रप्रस्थ कॉलनीतील काही कुटुंबीयांची मदतही घेतली जाते. काही कुटुंबीयांकडून गहू, तांदूळ, तेल, मसाले मिळविले. सोशल मीडियावर वाढदिवसासाठी अवास्तव खर्च न करता मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे पुन्हा एकदा अन्नसेवा एक्स्प्रेस सुरू झाली आहे. भालदंड यांच्या घरात, परिसरातील वाघमारे, अकोलकर, भावसार, साळवे, बनसोडे परिवारातील महिला सदस्य स्वयंपाक बनवण्यासाठी विनामूल्य सेवा देत आहेत. सकाळी १० पर्यंत सर्व जेवण तयार करून त्याचे पॅकिंग केले जाते. नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक, मार्केट यार्ड, नागपूर विभागातील काही मजूर, ऑक्सिजन प्लांटमध्ये येणाऱ्या वाहनचालकांना मोटारसायकलवरून जाऊन डबे पोहोच केले जातात. तसेच एमआयडीसी विभागातील काही मजुरांनाही ते डबे पोहोच करतात. भालदंड यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या सेवेचे कौतुक होत आहे.

नागरदेवळे येथील इंद्रप्रस्थ कॉलनी भागातील महिला एकत्र येऊन दररोज दीडशे ते दोनशे डबे तयार करतात. त्याचे पार्सल तयार केले जाते. हुरहुन्नरी कलाकार शुभम भालदंड यांच्यासोबतीला प्रवीण वाघमारे, सुचिता भावसार, अलका अकोलकर, अजय भावसार, कृष्णा अकोलकर, सागर बनसोडे, गणेश शिंपी, अभय पिसाळ, राकेश सपट आदी परिश्रम घेत आहेत.

----

आम्ही घरीच, परिसरातील महिलांच्या मदतीने दररोज दीडशे ते दोनशे जेवणाचे डबे तयार करतो. तयार केलेले जेवण आम्ही मोटारसायकलने गरजूंपर्यंत पोहोच करतो. हे काम करताना एक वेगळेच समाधान लाभते. जर कोणी आजारी असेल त्यांच्यासाठी डॉ. गणेश गायकवाड यांच्या सहकार्याने आम्ही औषधे व जेवण असे दोन्हीही देतो.

- शुभम भालदंड, युवक कार्यकर्ता.

फोटो-23 अन्नसेवा एक्स्प्रेस (मेलवर)

अन्नसेवा एक्स्प्रेस या अन्नदान सेवेसाठी नागरदेवळे येथील तरुण, महिला स्वयंपाकात व्यस्त आहेत.

Web Title: The food service express became the basis for the homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.