केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : आरोपींना हवेय हत्याकांडाचे फुटेज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 11:23 AM2018-07-14T11:23:23+5:302018-07-14T11:26:41+5:30
केडगाव हत्याकांडातील आरोपींच्यावतीने दोषारोपपत्रात नमूद असलेले सीसीटिव्ही फुटेज, मोबाईलचा व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती सीआयडीच्यावतीने आरोपींना देण्यात आल्या नाहीत.
अहमदनगर : केडगाव हत्याकांडातील आरोपींच्यावतीने दोषारोपपत्रात नमूद असलेले सीसीटिव्ही फुटेज, मोबाईलचा व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती सीआयडीच्यावतीने आरोपींना देण्यात आल्या नाहीत. यावर आरोपींनी न्यायालयात तक्रार करीत सीसीटिव्ही फुटेज, मोबाईलचा व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती मिळण्याची मागणी केली.
केडगाव हत्याकांडप्रकरणी दोषारोपपत्रात नाव असलेल्या भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, नगरसेवक विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाळासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप उर्फ जॉन्टी बाळासाहेब गि-हे व महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांना शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़एस़ पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.
यावेळी सर्व आरोपींना दोषारोपपत्राच्या प्रती देण्यात आल्या. मात्र, दोषारोपपत्रामध्ये नमूद असलेले सीसीटिव्ही फुटेज, मोबाईलचा व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबाची प्रती नव्हत्या. त्यामुळे आरोपींनी याबाबत वकिलामार्फत न्यायालयाकडे तक्रार केली.