अहमदनगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून २७ लाखांची विदेशी दारू जप्त
By अण्णा नवथर | Published: July 20, 2023 11:51 AM2023-07-20T11:51:40+5:302023-07-20T11:51:57+5:30
नगर कल्याण रोड विदेशी दारू चा एक टेम्पो नगर मध्ये येत असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली.
अहमदनगर - नगर कल्याण रोड वरील नेप्ती नाका येथे सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा आयशर टेम्पोसह दोघांना बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले. आरोपींकडून गोवा येथून विक्रीसाठी आणलेली तब्बल २७ लाख ४४ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याची मोहीम स्थानिक गून्हे शाखेने हाती घेतली आहे.
नगर कल्याण रोड विदेशी दारू चा एक टेम्पो नगर मध्ये येत असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाठवून नगर कल्याण रोडवरील नेपती नाका येथे सापळा लावला. त्यावेळी एक आयशर टेम्पो येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी चालकास थांबण्याचा इशारा केला असता त्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला. पोलिसांनी टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये विविध प्रकारची विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले
पोलिसांनी याबाबत चालकांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नव्हती. या प्रकरणी बाबू लखूभाई राठोड (रा. राजकोट, गुजरात) व सिद्धेश संदीप खरमाळे ( रा.भांडगाव ता. पारनेर )अशा दोन जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शना खालील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, संतोष लोंढे, संदीप जाधव, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ ,अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने केली.