डोंगराला लागलेला वणवा काही मिनिटातच विझविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:19 AM2021-03-14T04:19:50+5:302021-03-14T04:19:50+5:30
केडगाव : दुपारची बाराची वेळ, राज्यस्तरावरील प्रशिक्षकांची मृद, जलसंधारण व वनीकरण प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होती, एवढ्यात अचानक गावातील हबीबभाईंचा ...
केडगाव : दुपारची बाराची वेळ, राज्यस्तरावरील प्रशिक्षकांची मृद,
जलसंधारण व वनीकरण प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होती, एवढ्यात अचानक गावातील हबीबभाईंचा लाऊडस्पीकर वरील आवाज ऐकू आला. वणवा लागलायं.. मदतीसाठी धावा.. तब्बल २५ हून अधिक प्रशिक्षक पडलेली पोती ओली करून वणव्याच्या दिशेने धावले. जमेल तसे ते आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. काही मिनिटात गावातील ज्येष्ठ, युवकांनी हातात ओले पोते घेऊन डोंगरावर धाव घेत काही मिनिटात सारा वणवा विझविला.
गेली ३० वर्षे निसर्गाच्या संगोपनासाठी आणि गावाच्या विकासासाठी सर्वोत्तम योगदान देत आदर्श गाव असा सर्वदूर लौकिक वाढवणाऱ्या हिवरेबाजारमध्ये (ता.नगर) गुरुवारी दुपारी ही घटना घडली. यातून नागरिकांच्या एकोप्याचा प्रत्यय आला तर प्रशिक्षणार्थींना थेट वणवा विझविण्याचा अनुभव मिळाला.
राज्यात नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम करण्यासाठी यशदा मार्फत कार्यशाळा सुरू आहे. यातील थिमटिक प्रशिक्षणातील मृद,
जलसंधारण व वनीकरण प्रशिक्षकांची कार्यशाळा सुरू आहे. कार्यशाळेच्या हाॅलच्या मागील बाजूच्या रोड्याच्या डोंगरावर दुपारी बाराच्या दरम्यान शॉर्टसर्किटने अचानक वणवा लागला. सामाजिक कार्यकर्ते हबीबभाई सय्यद यांनी पाहिले. क्षणार्धात त्यांनी प्रशिक्षण हॉलमधील प्रशिक्षकांना मदतीसाठी येण्याचे आवाहन केले. सर्वांनी जमेल तसा वणवा विझविण्यासाठी योगदान दिले. मात्र वणव्याचा धूर पाहून अवघ्या काही मिनिटात ज्येष्ठ, युवकांनी धाव घेतली. त्यांनी दाखविलेली तत्परता पाहून राज्यभरातून आलेले प्रशिक्षक अचंबित झाले. गावातील वनसंपदा जोपासण्यासाठी आईने डोक्यावरून पाणी तर वडिलांनी केलेल्या श्रमदानातून फुललेली वनसंपदा जणू आपल्या मालकीची असलेली भावना वणवा विझविताना तरुणांमध्ये दिसली.
याबाबत पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, ‘गाव आपलाच आहे, ही भावना गावातील प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. गाव विकासात युवकच पुढाकार घेत आहे.’
----
१३ हिवरे बाजार
हिवरेबाजार येथील डोंगराला लागलेली आग विझविताना ग्रामस्थ.