पत्रकार दातीर हत्याकांडाला वेगळे वळण; भाजपच्या माजी आमदाराचा मंत्री तनपुरे यांच्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 05:20 PM2021-04-10T17:20:41+5:302021-04-10T17:21:18+5:30
Rohidas Datir murder: अखेर संगनमताने दातीर यांची हत्या झाली. राजकीय पाठबळ असल्याशिवाय ही हत्या होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवाजी कर्डिले यांनी केली आहे.
अहमदनगर : राहुरी येथील एका सप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. कर्डिले यांनी पोलीस तपासाचा संदर्भ देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड मंत्री तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी दातीर यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असून त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कर्डिले यांनी केला आहे.
दातीर यांच्या हत्या प्रकरणात कर्डिले हे शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्डिले यांच्या आरोपांमुळे या हत्याकांड प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून यामध्ये राज्यमंत्री तनपुरे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पत्रकार दातीर यांचे राहुरी येथून 6 एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोघा आरोपींना अटक केले आहे.
यासंदर्भात बोलताना कर्डिले म्हणाले की, दातीर यांची हत्या झाल्यानंतर राज्यमंत्री तनपुरे हे त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. या घटनेची अम्ही बारकाईने माहिती घेतली आहे. राहुरी येथील पठारे नावाच्या शेतकऱ्याचा 18 एकराचा भूखंड होता. या भूखंडावर नगरपालिकेने आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठवण्यात आले. याच भूखंडावर मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा सोहम याच्या नावाने एका कंपनीची स्थापना करण्यात आली असून या कंपनीत तनपुरे यांचा सख्खा मेहुना देशमुख व दातीर यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी कान्हू मोरे यांचा मुलगा यशवंत मोरे हे भागीदार आहेत. या भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. दातीर यांना या आधी आरोपींकडून अनेक वेळेस धमक्या आल्या होत्या. त्यांनी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यांना मात्र पोलीस संरक्षण देण्यात आले नाही.
अखेर संगनमताने दातीर यांची हत्या झाली. राजकीय पाठबळ असल्याशिवाय ही हत्या होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असून पोलिसांनी मागितले तर ते पुरावे आम्ही त्यांना देऊ, तसेच या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले पत्रकार परिषद घेऊनच यासंदर्भात बोलणार आहे.