मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:21 PM2017-09-03T15:21:01+5:302017-09-03T15:21:38+5:30
अहमदनगर : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संभाजीराव म्हसे यांचे औरंगाबाद येथे रविवारी पहाटे ...
अहमदनगर : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संभाजीराव म्हसे यांचे औरंगाबाद येथे रविवारी पहाटे आजारपणाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी दीपलक्ष्मी म्हसे यांचे ते पती, औरंगाबाद खंडपीठातील अॅड. माधवेश्वरी व पुणे येथील आर्किटेक्ट राजेश्वरी यांचे ते वडिल होत.
राहुरी तालुक्यातील कोंढवड या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या म्हसे यांनी १४ जुलै १९७१ रोजी वकिली व्यवसायाची सनद मिळवली. वकिली व्यवसाय करताना म्हसे यांनी मंडळ अधिकारी न्यायाधिकरणापासून ते जिल्हा न्यायालय, सहकार न्यायालय, कामगार न्यायालय, मंत्रालयातील विविध न्यायाधिकरणे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशा विविध पदांवर यशस्वी कारकीर्द गाजविली. कमाल जमिन धारण कायद्यातील सुधारणा, निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावण अशा विविध महत्वाच्या न्यायप्रक्रियांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख यांच्यातील देशभर गाजलेल्या खटल्यात म्हसे यांनी बुद्धीचातुर्य व ज्ञानाची चुणूक दाखविली. त्यामुळेच निवडणूक आचारसंहितेत मोठे फेरबदल करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून १६ एप्रिल १९९६ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी २००९ पर्यंत काम पाहिले. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून जवळपास दोन ते तीन वर्षे काम पाहिले़ प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी अहमदनगर येथे पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला़ मात्र, राज्य शासनालासुद्धा त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून घ्यावासा वाटला व म्हणूनच जानेवारी २०१७ मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी तीन वर्षासाठी त्यांची नेमणूक केली होती.