कृषी विद्यापीठाची जागा माजी नगरसेवकाने गिळली? तहसीलदारांना पत्र; अतिक्रमण तातडीने काढून देण्याची मागणी
By शिवाजी पवार | Published: July 31, 2023 07:18 PM2023-07-31T19:18:48+5:302023-07-31T19:19:06+5:30
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या श्रीरामपूर येथील फळपिके संशोधन प्रकल्पाच्या जागेवर माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या श्रीरामपूर येथील फळपिके संशोधन प्रकल्पाच्या जागेवर माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने तहसीलदारांकडे अतिक्रमण काढून देण्यासाठी तातडीने पत्र पाठविले असून त्यावर कारवाई सुरू झाली आहे.
शहरातील जुने तहसील कार्यालयाजवळ विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पाची ही जागा आहे. त्यावर राजेश अलघ व अन्य चार जणांनी अतिक्रमण केले असून ते काढून द्यावे, अशी मागणी अशी विद्यापीठाच्या वतीने तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या फळपिक संशोधन प्रकल्पाच्या ४६० (१) जमिनीवर माजी नगरसेवक राजेश अलग यांनी १५ जुलै २०२३ या दिवशी नवीन तारेचे कूंपन केले. विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकारी यांनी अतिक्रमणाचे काम थांबविले होते. मात्र राजेश अलग, सारिका राजेश अलग, प्रविण हरिराम अलग, प्रशांत हरिराम अलग, अक्षय प्रशांत अलघ यांनी ११ जुलै या दिवशी कार्यालयीन वेळेनंतर विद्यापीठाच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केले. तेथे जय माता दी मित्र मंडळ असा फलक लावला, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.
तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण ताबडतोब काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची श्रीरामपूर शहरात जागा आहे. सदर जागेवर लोकांनी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात नगरपालिकेला पत्र पाठवून अतिक्रमण काढून जागा विद्यापीठाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केलेली आहे.
विठ्ठल शिर्के, महात्मा कृषी विद्यापीठ, राहुरी
मंडल अधिकार्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कागदपत्रांची पाहणी करून उचित कार्यवाही केली जाणार आहे. मिलिंद वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर.