माजी मंत्री भारस्कर यांचे निधन

By Admin | Published: May 2, 2016 11:11 PM2016-05-02T23:11:40+5:302016-05-02T23:28:27+5:30

अहमदनगर : राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री व नगरचे सुपुत्र बाबुराव नामदेव भारस्कर (वय ८६) यांचे रविवारी (दि़ १) निधन झाले.

Former minister Bharadkar dies | माजी मंत्री भारस्कर यांचे निधन

माजी मंत्री भारस्कर यांचे निधन

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : जुन्या आठवणींना उजाळा
अहमदनगर : राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री व नगरचे सुपुत्र बाबुराव नामदेव भारस्कर (वय ८६) यांचे रविवारी (दि़ १) निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी येथील अमरधाम येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते़
भारस्कर यांची अंत्ययात्रा सोमवारी दुपारी टिळकरोड येथील त्यांच्या शामा चंद्रमुखी या निवासस्थानातून निघाली. अमरधाम येथील शोकसभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते, तहसीलदार सुधीर पाटील, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त माधव वाघ, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. यावेळी माजी आमदार दादा कळमकर, लहू कानडे, पोपट साठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भारस्कर यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९३० मध्ये झाला. त्यांचे शिक्षण शेवगाव व नंतर नगर आणि पुण्यात झाले.
विद्यार्थीदशेतच ते १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभागी झाले. १९५२ मधे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते श्रीगोंदा-कर्जत या राखीव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. यानंतर १९५७, १९६२, १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते याच मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले.
१९६७ मध्ये त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ भारस्कर यांनी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोग आदी संस्थांवर त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले़
त्यांनी काही काळ जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले़ बाळासाहेब भारदे, रावसाहेब पटवर्धन या जिल्ह्यातील नेत्यांना ते आदर्श मानीत. त्यांच्या अंत्यविधीस जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या पिढीतील अनेक नामवंत, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. शांत, संयमी तसेच सर्वसामान्य लोकांच्या कामाबाबत सदैव तत्पर असणाऱ्या भारस्कर यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.
(प्रतिनिधी)
बाबुराव भारस्कर यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने समाजात लोकप्रियता मिळवली होती. विकासापासून वंचित राहिलेल्या घटकांचे प्रतीनिधीत्व करतांना विकासाच्या मुख्य प्रवाहात या समाज घटकाला आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. समाजकल्याण विभागाचे मंत्रिपद भूषविताना त्यांनी नाही रे वर्गाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. मातंग समाज आर्थिक उन्नती विकास महामंडळाची निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. कॉँग्रेस पक्षाच्या सर्व संघटनात्मक कार्यात भारस्कर यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. त्यांच्या कार्याचा अनुभव लक्षात घेऊन विविध निवडणुकांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. विखे कुटुंबीय आणि त्यांचा असलेला ऋणानुबंध राजकारणापलिकडचा होता.
-राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेते

Web Title: Former minister Bharadkar dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.